Israel – Hamas War News in Marathi : बरोबर दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी बेसावध असलेल्या इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. हजारो क्षेपणास्र गाझा पट्टीवरून इस्रायलरवर डागत पहिल्या दिवशी जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला होताच बेसावध असलेल्याने इस्रायल सावध भूमिका घेत आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्याच हल्ल्यात त्यांनी युद्धाची घोषणा करून हमासला प्रत्युत्तरही दिलं. तेव्हापासून आजपर्यंत इस्रायल आणि हमासमधील युद्ध दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. इस्रायलच्या संरक्षण विभागाने यासंदर्भात X या समाजमाध्यमावर पोस्ट करत २ आठवड्यांत नेमकं काय काय घडलं याची सविस्तर माहिती दिली आहे.
इस्रायलने हवाई, जमीन आणि पाण्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. अनेक मित्र राष्ट्रांच्या मदतीने इस्रायलने हमासविरोधात युद्ध छेडलं आहे. परिणामी या युद्धामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन नागरिकांचा हाकनाक बळी जात आहे. आतापर्यंत दोन्ही देशांतील हजारो नागरिकांचा जीव गेला आहे. तर, हजारो नागरिक जखमी आहेत. या जखमींवर उपचार करण्याकरता रुग्णालयात सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी ही परिस्थिती आणखी चिघळत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इस्रयाल-हमास युद्धात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा जीव गेल्याची माहिती इस्रायल संरक्षण विभागाने दिली आहे.
हेही वाचा >> Israel-Hamas युद्धात अमेरिकेपाठोपाठ रशियाची उडी, ओलिसांबाबत मॉस्कोची हमासशी चर्चा
IDF ने काय माहिती दिली?
IDF ने X वर दिलेल्या माहितीनुसार, हमास संघटनेने ६९०० हून जास्त क्षेपणास्र गाझा पट्टीवरून इस्रायलवर डागली आहेत. त्यापैकी ४५० पेक्षा अधिक क्षेपणास्र अपयशी ठरली आहेत. या युद्धात आतापर्यंत इस्रायलच्या १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, ४६०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तर, २०० हून अधिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
इस्रायलमध्ये घुसखोरी केल्यानंतर १००० हून अधिक हमास दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर, हमासच्या डझनभर महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
विजयी होईपर्यंत लढू
हमासने आज दोन अमेरिकेतील ओलिसांची सुटका केली. यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा नागरिकांना वचन दिलं आहे. विजयी होत नाही तोवर लढा सुरूच ठेवणार असल्याचं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं आहे. आमच्या दोन ओलिसांना सोडण्यात आलं आहे. सर्व अपहृत आणि बेपत्ता नागरिक घरी परतत नाहीत तोवर हे प्रयत्न सुरूच राहणार आहेत, असं शुक्रवारी बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले.
हेही वाचा >> पॅलेस्टिनी मदतीच्या प्रतीक्षेत;गाझावर बॉम्बवर्षांव,लेबनॉनजवळचे गाव रिकामे
दरम्यान, अमेरिका, इंग्लड आणि भारतानंतर इस्रायलला रशियानेही पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादी संघटना हमासने रशियाशी संपर्क साधला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी २०० हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. या ओलिसांना सोडण्याबाबत रशिया आणि हमासमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. जगातल्या दोन महाशक्ती अमेरिका आणि रशियाने या युद्धात उडी घेतल्याने याचा संपूर्ण जगाला फटका बसू शकतो. इस्रायल हमास युद्धाबाबतच्या अमेरिका आणि रशियाच्या भूमिका जगाला शीतयुद्धाची आठवण करून देत आहेत.
इस्रायल-हमास युद्धाबाबत अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने इस्रायलच्या मदतीसाठी भूमध्य सागरात युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांवर लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहेत.. तर दुसऱ्या बाजूला रशियाने काळ्या समुद्रात विध्वसंक क्षेपणास्रं आणि लढाऊ विमानं तैनात केली आहेत. ही परिस्थिती पाहता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे.
स्थलांतरित परतण्याचा धोका
इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर गाझामध्ये आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी स्थलांतर केले असून ते सर्वजण दक्षिण भागात गेले. दक्षिण गाझा सुरक्षित असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगतिले होते, पण गाझामध्ये कोणतीही जागा सुरक्षित नाही असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते नीर दिनार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दक्षिण गाझामध्येही इस्रायलचे हवाई हल्ले सुरू असल्याने आता तिथे गेलेले स्थलांतरित पुन्हा एकदा उत्तर भागात परततील अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या प्रवक्त्या रविना शामदासानी यांनी व्यक्त केली.
रुग्णालयांसमोरील संकट अधिक गडद
रुग्णालयांमधील वैद्यकीय सामग्री आणि जनरेटरसाठी आवश्यक असलेले इंधन काही तासांमध्ये संपेल अशी शक्यता आहे. त्यांचा वापर जपून केला जात आहे. डॉक्टरांवर फोनच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्याची आणि जखमा धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करण्याची वेळ आली आहे.
मदतसामग्रीला परवानगी नाहीच
गाझा आणि इजिप्तच्या राफा सीमेवर २०० ट्रकमधून तीन हजार टन मदतसामग्री गाझा पट्टीत जाण्याची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत पडून आहे. गाझामध्ये ही मदतसामग्री जाऊ देण्यास इस्रायलने अद्याप परवानगी दिलेली नाही. आलेली मदतसामग्री सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांनाच मिळेल, हमासच्या ताब्यात जाणार नाही याची हमी इस्रायलला हवी आहे.