एपी, देर अल-बलाह
इस्रायल आणि हमासदरम्यान रविवारपासून युद्धविराम लागू झाल्यामुळे गाझामध्ये तब्बल १५ महिन्यांनंतर शांतता नांदण्याची आशा निर्माण झाली आहे. युद्धविरामाच्या करारानुसार पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांच्या कालावधीत युद्ध थांबवले जाईल, तसेच हमासच्या ताब्यातील ओलिसांची आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वनिर्धारित वेळापत्रकाप्रमाणे स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी ८.३० वाजता करार अंमलात येणार होता. मात्र, हमासने अखेरच्या क्षणी सुटका करावयाच्या तीन ओलिसांची नावे जाहीर न केल्यामुळे कराराची अंमलबजावणी होण्यास तीन तासांचा उशीर झाला आणि काहीशी अनिश्चितता निर्माण झाली. हमासने या ओलिसांची नावे सकाळी ८.३०पूर्वी जाहीर करणे अपेक्षित होते. अखेर दोन तासांच्या विलंबानंतर नावे जाहीर करण्यात आली आणि सकाळी ११.१५ वाजता करार लागू झाला. या दोन तासांच्या कालावधीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान २६ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असे गाझाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Mahakumbh Mela : महाकुंभ मेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे १८ तंबूंमध्ये भीषण अग्नीतांडव; मुख्यमंत्री आदित्यनाथ घटनास्थळी दाखल!

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास १,२०० इस्रायली नागरिक ठार झाले होते. त्याशिवाय हमासने २५० जणांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. त्यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश होते. त्यापैकी काही ओलिसांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ८ ऑक्टोबरपासून गाझावर हल्ले सुरू केले. त्यामध्ये गाझा शहरासह, राफा, देर अल-बलाह, खान युनिस यासारखी अनेक महत्त्वाची शहरे बेचिराख झाली आहेत.

युद्धामुळे गाझाच्या २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास २० लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्याशिवाय इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान ४६,९१३ पॅलेस्टिनी ठार तर १,१०,७५० जखमी झाल्याची पाहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. मृत आणि जखमींमध्ये बहुसंख्य महिला आणि मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल; देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणल्याचा दावा!

पॅलेस्टिनींचा जल्लोष

करार रविवारी प्रत्यक्षात अंमलात येण्यापूर्वीत संपूर्ण गाझा पट्टीत पॅलेस्टिनी नागरिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. संपूर्ण प्रदेश बेचिराख करणारे युद्ध १५ महिन्यांनंतर थांबण्याची आशा निर्माण झाल्यामुळे लोक आनंदात होते. काही ठिकाणी हमासचे अतिरेकीही त्यांच्याबरोबर सहभागी झाले. काही ठिकाणी हमासच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

कराराचे तपशील

● युद्धविरामाचा पहिला टप्पा सहा आठवड्यांचा असेल. त्या कालावधीत गाझामधून ३३ ओलिसांची सुटका केली जाईल. त्याबदल्यात शेकडो पॅलेस्टिनी कैदी आणि कच्चे कैदी यांना परत पाठवले जाईल.

● यादरम्यान, गाझातील बफर क्षेत्रातून इस्रायली फौजा माघार घेतील आणि विस्थापित पॅलेस्टिनींना परत येता येईल. तसेच उद्ध्वस्त झालेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत पुरवली जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war ceasefire takes effect in gaza halting 15 months conflict css