पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध पेटलं आहे. या संघर्षामध्ये दोन्ही देशातील अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या युद्धाचे पडसाद आता जगभर सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, सोमवारी दिल्लीतील काही विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इस्रायली दूतावासाजवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया आणि दिल्ली विद्यापीठातील अनेक विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते. या आंदोलनाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड बॅरिकेड्स उभारले होते.

हेही वाचा- Israel-Hamas War: गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा ‘तो’ VIDEO हमासकडून जारी

यावेळी काही विद्यार्थ्यांनी इस्रायली दूतावासाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित विद्यार्थ्यांकडे निषेध मोर्चा काढण्यासाठी आवश्यक परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, याबाबतची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. “कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन करण्याची परवानगी नाही,” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

हेही वाचा- “…घरातील संपूर्ण फरशी रक्ताने माखली होती”, आजीच्या हत्येबद्दल इस्रायली तरुणीने सांगितला भयावह घटनाक्रम

विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी इस्रायली दूतावासाच्या दिशेनं पळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) दिल्ली युनिटचे अध्यक्ष अभिज्ञान म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात नेलं आहे.