गेल्या १७ दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर या युद्धाला तोंड फुटलं. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करत गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव केला. गेल्या १७ दिवसांपासून इस्रायलकडून बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, गाझामधील एका अल्पवयीन मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये संबंधित मुलगी कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याने टाहो फोडताना दिसत आहे. तिचा संपूर्ण आक्रोश कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत पीडित मुलगी एका निर्वासित छावणीजवळ आपल्या आईचा शोध घेताना दिसत आहे. दरम्यान, तिथे एका महिलेचा मृतदेह आणला असता तो मृतदेह माझ्याच आईचा आहे, असा दावा पीडित मुलीने केला. तसेच मला माझ्या आईला बघू द्या. तो माझ्याच आईचा मृतदेह आहे. मी तिच्या केसांवरून तिला ओळखते, ती माझीच आई आहे, अशी विनवणी पीडित मुलगी करत आहे. दरम्यान, तेथील एक व्यक्ती पीडित मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अल्पवयीन मुलगी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे.
हेही वाचा- Israel-Hamas War: गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा ‘तो’ VIDEO हमासकडून जारी
“मृत महिला तुझी आई नाही, दुसरं कुणीतरी आहे”, असं निर्वासित छावणीतील कर्मचाऱ्याने सांगताच पीडित मुलीने टाहो फोडला आहे. “ती माझी आईच आहे. मी शपथ घेऊन सांगते, ती माझी आईच आहे. मी तिच्या केसांवरून तिला ओळखते, ती माझीच आई आहे. ती मला सोडून का गेली? देवा, तू माझ्या आईला माझ्यापासून दूर का केलंस? आई मी तुझ्याशिवाय खरंच जगू शकत नाही. प्लिज, मला माझ्या आईला बघू द्या. मी तुमच्याकडे हात जोडून विनवणी करते, प्लिज मला तिला बघू द्या. प्लिज कुणीतरी माझा भाऊ अहमदला शोधा…” अशी विनवणी अल्पवयीन मुलगी तिच्या मातृभाषेत करताना दिसत आहे. याबाबतचं शब्दांकन ‘अल्जझिरा’ने प्रकाशित केलं आहे.
“त्यांनी (इस्रायल) माझ्या आईला आणि बहिणीला मारलं, मला त्यांच्याशिवाय कुणीही नाही. चांगल्याच लोकांना का मारलं जातंय? मी शपथ घेऊन सांगते, मी माझ्या आईशिवाय जगू शकत नाही, आईसह मीही मेले असते, तर बरं झालं असतं,” अशा शब्दांत पीडित मुलीने आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
“ते सर्वजण शहीद झाले आहेत. ते स्वर्गात गेले आहेत” अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता या मुलीच्या भावना अनावर झाल्याचे दिसत आहे. “मला माहीत आहे, ते सर्वजण शहीद झालेत. पण माझ्या आजी-आजोबांचा जीव घेणं, त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं का? आता त्यांनी माझी काकी, त्यांची मुलं, माझी आई आणि बहिणीचाही जीव घेतला. आता मी हे सगळं सहन करू शकत नाही. आमच्यावर दया करा, आम्ही तुमचं काय वाईट केलंय?” अशा शब्दांत पीडित मुलगी आपली व्यथा मांडताना व्हिडीओत दिसत आहे.