Israel – Hamas War : इस्रायल व हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात गाझा पट्टी येथे इस्रायलच्या ११ सैनिकांचा मृ्त्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय हालेल सोलोमन या सैनिकाचा समावेश आहे. भारतीय वंशाचा सैनिक हालेल सोलोमन हा दक्षिण इस्रायलमधील दीमोना या शहरातील रहिवासी होता. हालेलच्या मृत्यूवर दीमोना शहराचे महापौर बेनी बिट्टोन यांनी दुःख व्यक्त केले आहे.
‘दीमोनाचा सुपूत्र हालेल सोलोमन हा गाझा पट्टीत सुरु असलेल्या हल्ल्यात शहीद झाला आहे. हालेल हा गीवाती ब्रिगेडमध्ये सहभागी झाला होता. सदैव दुसऱ्यांना देण्यातच तो आनंद मानायचा. हालेलच्या निधनामुळे संपूर्ण दीमोना शहरवासीयांना दुःख झाले’, अशी प्रतिक्रिया महापौर बिट्टोन यांनी दिली. दीमोना या शहराला ‘लिटल इंडिया’ या नावानेही ओळखले जाते. भारतातून मोठ्या संख्येने ज्यू नागरीक स्थलांतरीत होऊन दिमोना शहरात स्थायिक झाले आहेत. तसेच अणूभट्टीसाठी देखील हे शहर ओळखले जाते.
हेही वाचा : पत्नीने आयब्रोज केल्याने सौदीत बसलेला पती भडकला! व्हिडीओ कॉलवरच दिला तलाक
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलला संबोधित करताना शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. ‘हे युद्ध आपल्यासाठी अवघड आहे. आपल्याला सैनिक गमवावे लागत आहेत, पण जोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही तोपर्यंत युद्ध सुरुच राहणार आहे’, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Israel-Hamas War: अँजेलिना जोली जगभरातल्या नेत्यांवर भडकली; म्हणाली, “या संहारात सगळेच सामील”!
दरम्यान, हमासने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यात १४०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच हमासचे दहशतवादी इस्रायलच्या २४० नागरिकांना ओलिस म्हणून सीमेपलीकडे घेऊन गेले होते. अमेरिका व पाश्चात्य देशांचा पाठिंबा मिळालेल्या इस्रायलने आता हमासविरोधात युद्ध पुकारले आहे.