Indian Cricketer Comment on Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्धाला आता एक महिना होत आला आहे. ७ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा बळी केला आहे. एक महिना उलटला तरी, अद्याप दोन्ही बाजूने हल्ले चालूच आहेत. इस्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू झाली आहे. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजूने घेरलं आहे. त्यामुळे गाझात मोठ्या प्रमाणात विध्वंस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. वेगवेगळ्या देशांनी या युद्धाबाबत आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. जगभरातील लोकप्रिय खेळाडू, सेलिब्रेटीदेखील या युद्धाबाबत आपापली मतं मांडत आहेत
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यानेदेखील या युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. इरफानने गाझातल्या विध्वंसाच्या बातम्या पाहून हळहळ व्यक्त केली आहे. इरफानने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, गाझात दररोज ०-१० वर्षे वयोगाटातल्या निष्पाप मुलांचा बळी जातोय आणि जग मात्र स्वस्थ बसलंय. एक खेळाडू म्हणून मी फक्त बोलू शकतो. परंतु, जागतिक नेत्यांनी एकत्र येण्याची आणि या निर्घृण हत्या थांबवण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, या युद्धात आतापर्यंत ९,०६१ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे ३,६०० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे. दुसऱ्या बाजूला, युद्धसमाप्तीची चिन्हे दिसत नसल्यामुळे ते तात्पुरते तरी थांबावे यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा तात्पुरता ‘युद्धविराम’ सुचवला आहे.
इस्रायली रणगाडे अद्याप गाझाच्या वेशीवर
इस्रायली रणगाडे आणि फौजा गुरुवारी गाझा शहराकडे निघाल्या होत्या. परंतु, हमास आणि ‘इस्लामिक जिहाद’चे दहशतवादी गुरिल्ला पद्धतीने भुयारांमधून इस्रायली रणगाड्यांवर हल्ले करत आहेत. संपूर्ण गाझा पट्टीत भुयारांचं मोठं जाळं आहे. दहशतवादी या भुयारांचा वापर करून इस्रायली सैन्याला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे इस्रायली फौजा अद्याप गाझा शहराच्या वेशीवरच आहेत. याचाच अर्थ त्यांना गाझामधून अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र प्रतिकार होत आहे.