एपी, मुघ्रका (गाझा पट्टी)
इस्रायल आणि हमासदरम्यान झालेल्या युद्धविराम करारानुसार इस्रायलच्या फौजांनी गाझा कॉरिडॉरमधून मागे फिरण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. याबरोबरच, रविवारी नेत्झारिमच्या रस्त्यांवर मिळेल त्या वाहनातून सामान घेऊन आपापल्या घरी परत निघालेले पॅलेस्टिनी दिसत होते. या वाहनांना कोणताही अडथळा आणणार नाही असे इस्रायलने सांगितले आहे.
या करारानुसार नेत्झारिम कॉरिडॉरपासून ६ किलोमीटर अंतरावरील इस्रायलच्या फौजा मागे परतणार आहेत. या कॉरिडॉरमुळे गाझाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडतात. युद्धादरम्यान इस्रायलने या भागाचे रूपांतर पूर्ण लष्करी भागात केले होते. गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमास संघटनेत युद्धविराम करार झाला. त्यानंतर इस्रायलने उत्तर गाझा पट्टीमध्ये नागरिकांना जाण्याची परवानगी दिली. विस्थापित झालेले हजारो नागरिक उत्तरेकडे रवाना झाले. इस्रायलचे सैन्य आता प्रत्यक्ष मागे जात असल्याने या करारातील आणखी एक बाब पूर्ण होणार आहे.
युद्धविराम कराराचा दुसरा टप्पा केव्हा होईल, याच्या प्रतीक्षेत सारे आहेत. दुसऱ्या टप्प्यात इस्रायलच्या आणखी ओलिसांची सुटका आणि शस्त्रसंधी करारास मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्याच्या वाटाघाटींसाठी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी कतारला पाठवलेल्या शिष्टममंडळात दुय्यम महत्त्व असलेल्या अधिकाऱ्यांना पाठवल्यामुळे त्यांना पुढील टप्प्यात रस आहे की नाही याबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. या मुद्द्यावर पुढील चर्चा करण्यासाठी नेतान्याहू यांनी या आठवड्यात महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे १९ जानेवारीपासून सुरू झालेला युद्धविराम पहिल्या टप्प्यात सहा आठवडे चालणार असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याची मुदत आहे. युद्धविराम लागू होण्यापूर्वी आणि लागू झाल्यानंतरही दोन्ही बाजूंमध्ये अनेक वेळा मतभेद झाले. मात्र, आतापर्यंत तरी कराराच्या सर्व अटींचे पालन करण्यात आले आहे. शनिवारी हमासने तीन इस्रायली ओलिसांची आणि इस्रायलने १८३ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.