पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने तीन दिवसांपूर्वी इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलनेही हमासच्या अड्ड्यांवर आणि गाझा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर रॉकेट डागले. हमास आणि इस्रायलयमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू असून या युद्धाने आतापर्यंत १,६०० हून अधिक बळी घेतले आहेत. गाझा पट्टीत विध्वंस सुरू आहे. हमासने १५० हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. इस्रायलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झाली आहे. गाझा पट्टीचा बराचसा भाग इस्रायली सैन्याने आता आपल्या ताब्यात घेतला आहे. अशातच हमासने १५० ओलिसांना ठार करण्याची धमकी दिली आहे.
एकीकडे हमासने इस्रायलला ओलिसांना ठार मारू अशी धमकी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठं वक्तव्य करून हमासला उत्तर दिलं आहे. हे युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे. हमासचा प्रवक्ता अबू उबैदा याने इस्रायला धमकी दिली आहे की, गाझा पट्टीतल्या नागरिकांवर इस्रायलने हल्ला केल्यास कोणत्याही क्षणी आम्ही ओलिसांना ठार करू.
दरम्यान, या युद्धात दोन्ही बाजूच्या १,६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाझा पट्टीत आतापर्यंत ७०४ लोक मारले गेले आहेत. यामध्ये १४३ लहान मुलं आणि १०५ महिलांचा समावेश आहे. तसेच गाझा पट्टीत ४,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात ९०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २,६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हे ही वाचा >> फ्रान्स-जर्मनीसह पाच देशांचा इस्रायलला पाठिंबा; संयुक्त निवेदन केलं जारी, म्हणाले, “आम्ही सर्वजण…”
पंतप्रधान नेतन्याहू काय म्हणाले?
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “इस्रायल या दहशतवाद्यांशी दोन हात करत आहे. हे युद्ध आम्हाला नको होतं. पण अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतीने हे युद्ध आमच्यावर लादलं गेलं आहे. हे युद्ध इस्रायलनं सुरू केलं नसलं तरी याचा शेवट आम्हीच करणार आहोत. एकेकाळी ज्यू लोक भूमीहीन होते. काही काळासाठी ज्यू लोक निराधार होते. परंतु यापुढे असं चालणार नाही.”