Israel-Hamas War Gaza Truce Deal : गेल्या १५ महिन्यांपासून इस्रायल व हमासमधील युद्धामुळे मध्य-पूर्व आशियात तणावाचं वातावरण आहे. सुरुवातीला अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात कोणालाही यश आलं नाही. नंतर इराण, लेबनान, हेझबोला (लेबनानमधील दहशतवादी संघटना), सीरियासारख्या देशांनी या युद्धात उडी घेतल्यामुळे या युद्धाची व्यापकता आणखी वाढली. यामुळे संपूर्ण आशिया खंडात तणाव निर्माण झाला. अखेर आता हे युद्ध थांबण्याची शक्यता आहे. कतारने यासाठी पुढाकार घेतला आहे. हे यु्द्ध थांबवण्यासाठी व हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसंबंधीच्या सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. इस्रायली प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की मंगळवारी संध्याकाळपर्यंत या सामंजस्य करारावर दोन्ही बाजूच्या लोकांची सहमती होईल.
दरम्यान, एका इस्रायली अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना सांगितलं की ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका हा युद्धबंदीच्या मसुद्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३३ ओलिसांची सुटका केली जाईल. ज्यामध्ये लहान मुलं, महिला व ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या सैनिकांचा समावेश असेल. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप त्यांचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यास एक आठवडा शिल्लक आहे. तोवर युद्धबंदी होऊ शकते. कतारबरोबरच अमेरिकाही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चेला यश आलं आहे. लवकरच इस्रायल व पॅलेस्टाइनमध्ये यासंबंधीचा करार होऊ शकतो.
टप्प्याटप्प्याने युद्धबंदी होणार
या करारानुसार युद्धबंदीचे काही टप्पे आहेत. पहिला टप्पा १५ दिवसांत पूर्ण झाल्यानंतर १६ व्या दिवसापासून दुसऱ्या टप्प्यातील मसुद्यावर चर्चा सुरू होईल. त्याअंतर्गत उर्वरित ओलीस नागरिक, पुरूष सैनिकांना मुक्त केलं जाईल. तसेच ज्या ओलीस नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ठार केलं आहे त्यांचे मृतदेह परत केले जातील. तसेच हमासने मारलेल्या सैनिकांचे मृतदेह देखील परत केले जातील. टप्प्याटप्प्याने इस्रायलचं सरकार त्यांचं सैन्य मागे घेईल. इस्रायली सीमेवरील गावांच्या संरक्षणासाठी सैन्यदल केवळ सीमावर्ती भागात असेल. सध्या इस्रायलचं सैन्य पॅलेस्टाइनमध्ये घुसलं आहे. ते माघारी बोलावलं जाईल. उत्तर गाझामधील रहिवाशांना परत जाण्याची परवानगी दिली जाईल. यासह या भागात शस्त्रे नेऊ नयेत यासाठी यंत्रणा तयार केली जाईल. मध्य गाझामधील नेत्झारिम कॉरिडॉरमधून इस्रायली सैन्य माघार घेईल.