Sharad Pawar Israel Hamas War : इस्लायल-हमास युद्धाचे संपूर्ण जगभर पडसाद उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जगाची दोन गटांत विभागणी झाली आहे. भारतातली परिस्थितीदेखील वेगळी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची भूमिका मांडली असली तरी देशातून मोदींच्या भूमिकेला विरोध होत आहे. देशातल्या अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली. तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे नेते शरद पवारांवर टीका करत आहेत.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना म्हणाले, जिथे युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण झालं आणि इस्रायल नावाचा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून इतर अनेक पंतप्रधानांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. यात इंदिरा गांधींपासून ते अटल बिहारी वाजपेयीपर्यंत सर्वांनीच पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली होती. दुर्दैवाने आपल्या आताच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे.

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपाच्या नेत्यांनी टीका केली आहे. भाजपा नेत्यांची सगळी वक्तव्ये शरद पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहेत. यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधकाम मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “शरद पवार हे जाणतात की ते एका विशिष्ट वर्गाला संतुष्ट करणारं वक्तव्य करत आहेत. त्यांचा संरचनात्मक दृष्टीकोन हवा.”केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “ही कुजलेली मानसिकता थांबली पाहिजे. मला आशा आहे की शरद पवार आता तरी आधी देशाचा विचार करतील. तर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांना माझी विनंती आहे की त्यांनी मतांच्या राजकारणाचा विचार करू नये आणि इस्रायलवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करावा. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, मला वाटतं, शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील.

या सर्वांच्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. तसेच पॅलेस्टाईनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१९ ऑक्टोबर) मांडलेल्या भूमिकेचा दाखला दिला आहे. यासह शरद पवार म्हणाले, “पॅलेस्टाईनबाबत मी व्यक्त केलेले विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरखित केले आहेत.” शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची पॅलेस्टाईनबाबतची भूमिका आणि त्यांची स्वतःची भूमिका एक्स या मायक्रोब्लॉगिंग अकाउंटवर शेअर केली आहे.

शरद पवार यांनी म्हटलं आहे की, पॅलेस्टाईनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत करतो. मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा करून गाझामधील अल अहली हॉस्पिटलमधील नागरिकांच्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. आम्ही पॅलेस्टिनी लोकांसाठी मानवतावादी मदत पाठवत राहू. पॅलेस्टाईन प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि ढासळत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत तीव्र चिंता वाटते. एकूणच इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेचे आणि त्यावरील ठरावांचे समर्थन केले.

हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धावर जो बायडेन यांचं मोठं वक्तव्य, पुतिन यांच्यावर आरोप करत म्हणाले…

त्याचबरोबर शरद पवार यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यापूर्वी जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयींपर्यंतच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या भूमिकेशी सुसंगत असेच विचार मी व्यक्त केले होते. इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोक राहत असलेल्या भागातील दीर्घकालीन वादावर तोडगा निघून शांतता आणि सौहार्द प्रस्थापित व्हावे, हेच त्यातून सांगायचे होते. मोदीजींनी तेच अधोरेखित केले, याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्या काही भाजपा नेत्यांना अशा संवेदनशील विषयावर राष्ट्राची भूमिका ध्यानात येईल.

Story img Loader