इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचे जगभर पडसाद उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. तर काही राष्ट्रांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या देशांमधील मुस्लीम संघटनांकडून पॅलेस्टाईनचं समर्थन केलं जात आहे. भारत या युद्धात इस्रायलच्या बाजूने उभा आहे. परंतु, भारतातल्या काही संघटनांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात आवाज उठवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातल्या अलिगड मुस्लीम विद्यापीठात तीन दिवसांपूर्वी पॅलेस्टाईनच्या समर्थनात एक मोर्चा काढण्यात आला होता. यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी आदित्यनाथ सरकार संतापलं आहे. इस्रायल-हमास युद्धात भारत सरकारच्या भूमिकेविरोधात कोणतंही वक्तव्य अथवा कृतीवर राज्य सरकारकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा योगी सरकारने दिला आहे.

नवरात्रोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, इस्रायल-हमास युद्धात भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेविरोधातली कृती राज्यात कुठेही दिसता कामा नये.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील धर्मगुरूंशी संवाद साधावा आणि राज्यात भारत सरकारच्या भूमिकेविरोधातली कुठलीही घटना घडता कामा नये, याची काळजी घ्यावी. समाजमाध्यमांवर अथवा कोणत्याही धार्मिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची उन्मादी, विक्षिप्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. कोणी जर तसा पयत्न केला तर अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश योगी आदित्यानाथ यांनी दिले आहेत.

अलिगड विद्यापीठात पॅलेस्टाईनच्या समर्थनात मोर्चा

उत्तर प्रदेशातल्या अलिगड मुस्लीम विद्यापीठात ९ ऑक्टोबर रोजी शेकडो विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात मोर्चा काढला होता. विद्यापीठाच्या आवारातच विद्यार्थ्यांनी पॅलस्टाईनच्या समर्थनात घोषणा दिल्या होत्या. तसेच यावेळी आंदोलकांनी धार्मिक घोषणादेखील दिल्या. अलिगड मुस्लीम विद्यापीठ हे पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं आहे, अशा आशयाचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी यावेळी झळकावले होते.

हे ही वाचा >> “…तोवर तुमचं पाणी, इंधन आणि वीज बंद”, इस्रायलच्या ऊर्जामंत्र्यांचा पॅलेस्टाईनला इशारा

चेन्नई-कोलकात्यातील संघटना पॅलेस्टाईनच्या समर्थनात रस्त्यावर

याचबरोबर चेन्नई आणि कोलकात्यातही इस्रायलच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले होते. एसआयओ इडिया नावाच्या संघटनेने इस्रायलविरोधात देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तमिळनाडू मुस्लीम मुनेत्र कळघम ही संघटना पॅलेस्टाईनच्या समर्थनात चेन्नईच्या रस्त्यांवर उतरली आहे. तर कोलकात्यात मायनॉरिटी यूथ फोरम ही संघनटना पॅलेस्टाईनच्या समर्थनात आंदोलन करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel hamas war up cm yogi adityanath orders action against who speaks against indias stand asc