Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरही परिणाम झाला आहे. जगभरातल्या अनेक देशांनी इस्रायल किंवा पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, भारत ही राष्ट्र इस्रायलच्या बाजूने उभी आहेत. तर इराण सौदी अरब, लेबनान आणि रशियासारख्या देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. अशातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात युद्धाबाबत बातचीत झाली. नेतन्याहू यांनी पुतिन यांना फोन केला होता. नेतन्याहू यांनी पुतिन यांना ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून ते आतापर्यंत गेल्या १० दिवसांत काय-काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इस्रायलवर क्रूर आणि निर्घृण हल्ला करण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने एकजूट होऊन इस्रायलवर हल्ला केला. आता आमचा देश थांबणार नाही. हमासचं सैन्य आणि त्यांची शस्त्रास्रं नष्ट होत नाहीत तोवर आम्ही थांबणार नाही. पंतप्रधान नेतन्याहू यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना सांगितलं आहे की हमासला संपवत नाही तोवर आपलं सैन्य मागे हटणार नाही.
दुसऱ्या बाजूला, रशियन परराष्ट्र मंत्रालयानेही दोन नेत्यांमध्ये काय बातचीत झाली याबाबतची माहिती दिली आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलताना पुतिन यांनी गाझा पट्टीत सुरू असलेला रक्तपात आणि वाढलेला संघर्ष थांबवण्यासाठी रशियाने उचललेल्या पावलांबाबत माहिती दिली. मॉस्कोने म्हटलं आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकटावर दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली.
जो बायडेन इस्रायल दौऱ्यावर जाणार
इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या लष्कराने जमिनीवरील कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे तिथलं युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवला असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन उद्या (१८ ऑक्टोबर) इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे राज्य सचिव अँटनी ब्लिंकन यांनी यासंदर्भात माहिती दिली. बायडेन हे इस्रायलच्या तेल अवीव शहराला भेट देतील. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे, त्याचवेळी पॅलेस्टाईन राज्यासाठी मार्ग असला पाहिजे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी व्यक्त केले. या संघर्षात इस्रायल युद्धाचे नियम पाळेल अशी आशाही बायडेन यांनी ‘६० मिनिट्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली.