Israel Hezbollah War : इस्रायलने हेजबोलावर सर्वात मोठा घाव केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हेजबोलाचा म्होरक्या हसन नसरल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे ही माहिती समोर आली आहे. इस्रायली लष्कर IDF ने याला दुजोरा दिला आहे. आता नसराल्लाह जगाला घाबरवू शकणार नाही, असं देखील इस्रायलने म्हटलं आहे.

IDF ने नेमकं म्हटलं आहे?

IDF ने म्हटलं की, “इस्रायल लष्कराने नसरल्लाहसह हेजबोलाच्या अतिरिक्त कमांडर्सना देखील ठार केलं. यापूर्वी इस्रायली लष्कराने दावा केला होता की, त्यांनी लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यांदरम्यान अनेक हेजबोला कमांडर मारले आहेत. नसराल्लाहच्या मृत्यूला लेबनॉन आणि हेजबोला यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. नसराल्लाहच्या मृत्यूची पुष्टी करत इस्रायली आर्मी आयडीएफने ट्विटरवर पोस्ट केले, ‘हसन नसराल्लाह यापुढे जगात दहशत माजवू शकणार नाही.’

IDF चे प्रवक्ते काय म्हणाले?

हेजबोलाच्या अल-मनार टेलिव्हिजनने वृत्त दिले की चार इमारती उद्ध्वस्त झाल्या, स्ट्राइकमुळे अनेक जीवितहानी झाली. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेक इमारती ढिगाऱ्याखाली गेल्या, त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेस सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील घरे हादरली. “इस्रायल संरक्षण दलांनी हेजबोला दहशतवादी संघटनेच्या मध्यवर्ती मुख्यालयावर अचूक स्ट्राइक करण्यात आला. आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक कारवाई केली. जेणेकरून इस्रायली कुटुंबे त्यांच्या घरात, सुरक्षितपणे राहू शकतील”, असं IDF चे प्रवक्ते डॅनियल हॅगरी म्हणाले.