इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. इस्राईलमध्ये १० लाख लोकसंख्येमागे १ हजार ८९२ जणांना करोना होत असल्याचं समोर आलं आहे. ऑगस्टच्या मध्यापासून करोना फैलाव वेगाने होत असल्याचं दिसत आहे. इस्राईलमध्ये करोनाची चौथी लाट सुरु आहे. तर जगातील सर्वाधिक लसीकरण असलेला देश आहे. इस्रायलमध्ये जुलैपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिले जात आहेत. लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. दुसरीकडे इस्रायलमधील करोनाचा वाढता फैलाव पाहता स्वीडनने नागरिकांना देशात प्रवेश बंदी केली आहे.
करोनाला सामोरे जाण्यासाठी, इस्रायलमधील नागरिकांवर करोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. ज्या लोकांना लसीचा तिसरा डोस मिळाला नाही, त्यांना प्रवास, बारमध्ये जाणे, बाहेर खाणे आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापासून रोखले जात आहे. इस्रायली नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांच्या आत फायझर-बायोटेक लसीचा तिसरा डोस घेणं आवश्यक आहे.
“करोनाची तिसरी लाटही संपेल पण…” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं
इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कवरील बंधनं शिथिल करण्यात आली होती. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता करोना रुग्ण वाढत असल्याने मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासोबत देशात विदेशी पर्यटकांची लसीकरण मोहिम ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.