जेरुसालेम : इस्रायलने लेबनॉननमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये हेजबोलाचा आणखी एक महत्त्वाचा नेता ठार झाला आहे. हेजबोलाच्या मध्यवर्ती परिषदेचा (सेंट्रल कौन्सिल) उपप्रमुख नबिल कौक ठार झाल्याचे इस्रायलने जाहीर केले. त्यानंतर काही वेळाने हेजबोलानेही त्याला दुजोरा दिला. यामुळे एका आठवडाभराच्या कालावधीमध्ये हेजबोलाच्या प्रमुखासह सात महत्त्वाच्या नेत्यांना ठार करण्यात इस्रायलला यश आले आहे.
इस्रायलने दक्षिण बैरुतमधील हेजबोलाच्या मुख्यालयावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा प्रमुख हसन नरसल्ला ठारा झाला. त्यानंतर आपले हल्ले सुरूच राहणार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले होते. त्यानुसार, शनिवारी इस्रायली सैन्याने बैरुतवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यामध्ये नबिल कौक ठार झाला. रविवारीही बैरुतवर हल्ले करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी ज्या हल्ल्यामध्ये नसरल्ला मारला गेला त्यामध्ये अली कराकी हा महत्त्वाचा नेताही मारला गेल्याचे हेजबोलाकडून सांगण्यात आले. लेबनॉनवरील गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत किमान एक हजार ३० जणांनी प्राण गमावले आहेत.
हेही वाचा >>> प. बंगालमधील पूरस्थिती चिंताजनक; केंद्र सरकार मदत करत नसल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
हेजबोलाने उत्तर इस्रायलवरील रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. मात्र, त्यापैकी बहुसंख्य रॉकेट, क्षेपणास्त्रे आधीच नष्ट करण्यात आली किंवा ती निर्मनुष्य जागेत पडली.
अमेरिकेच्या हल्ल्यात सीरियात ३७ अतिरेकी ठार
सीरियामध्ये केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये इस्लामिक स्टेट आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंधित ३७ अतिरेकी ठार झाल्याची माहिती अमेरिकेच्या लष्कराने रविवारी दिली. हे हल्ले १६ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरला करण्यात आले. मृतांमध्ये दोन महत्त्वाच्या अतिरेक्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.