Israel Hezbollah War : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. हेझबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवले आहेत. हसन नसरल्लाहलाच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीनही मारला गेल्याचे वृत्त समोर येत आहे. यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनची परिस्थिती गाझासारखी करण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी लेबनॉनला कडक इशारा दिला आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं की, ‘लेबनॉनने हेझबोलाला तुमच्या सीमेत काम करण्यास परवानगी दिली तर देशाची स्थिती गाझासारखी होऊ शकते. हेझबोलापासून तुमचा देश मुक्त करा. जेणेकरून हे युद्ध संपू शकेल आणि पुढील विध्वंस टाळता येईल’, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून लेबनॉनच्या लोकांना उद्देशून म्हटलं आहे. एवढंच नाही तर बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या लोकांना हेझबोलाला बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

हेही वाचा : Delhi Crime News : धक्कादायक! दिल्लीत सिरीयन शरणार्थी आणि त्याच्या तान्ह्या बाळावर अ‍ॅसिड हल्ला

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा इशारा दिला तेव्हा इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिणी किनारपट्टीवर हेझबोलाच्या विरोधात आक्रमण अधिक तीव्र केल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे इस्रायल आणि हेझबोला यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकीकडे हेझबोला पराभव स्वीकारायला तयार दिसत नाही, तर दुसरीकडे इस्रायलही विविध भागांवर हल्ले करत आहे. तसेच आता इस्रायलने लेबनॉनला कडक इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती आणखी चिघळण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.