Israel Iran Tensions : इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने गेल्या आठवड्यात त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्र डागली. मात्र इराणचा हा अनपेक्षित हल्ला रोखण्यात यशस्वी झाल्याचं सांगत इस्रायलने आपल्या हवाईदलाचं कौतुक केलं. इराणने सोडलेले ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रं इस्रायल आणि मित्र राष्ट्रांनी नष्ट केल्याचं इस्रायलने सांगितलं होतं. इराणने रविवारी (१४ एप्रिल) पहाटे १७० ड्रोन, ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडली होती. आता इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे.
इराणच्या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इसाफहान शहरात मोठे स्फोट झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, हा इस्रायलने केलेला हल्ला होता. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्र डागून त्यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.
इस्रायलने शुक्रवारी (१९ एप्रिल) सकाळी इराणमधील अनेक शहरांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला. इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोट झाले आहेत. या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच इसाफहान प्रांतात इराणच्या न्यूक्लीअर साईट्स (अणू संशोधन कार्यक्रम) आहेत. याच भागात इराणचा युरेनियम विकास कार्यक्रमही चालू आहे.
इसाफहान प्रांतात झालेल्या हल्ल्यावरून दावा केला जात आहे की, इस्रायलने इराणचा अणू कार्यक्रम बंद पाडण्यासाठीच हा हल्ला केला आहे. इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावाही केला जातोय. अद्याप या वृत्ताची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने त्यांच्या सर्व सैन्यतळांना हाय अलर्टवर ठेवलं आहे. तसेच इराणने त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम सक्रीय केली आहे.
हे ही वाचा >> काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
मीडिया रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी सकाळी काही व्यावसायिक विमानांनी पश्चिम इराणवरून जाताना कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा मार्ग बदलला. त्याचदरम्यान, इसाफहान प्रातांत स्फोट झाल्याचं वृत्त समोर आलं. व्यावसायिक विमानांनी मार्ग बदलणं आणि इसाफहान प्रांतात झालेल्या स्फोटांचा संबंध असल्याचे दावे स्थानिक माध्यमांनी केले आहेत. दुबई एमिरेट्स आणि फ्लायदुबई एअरलाईन्सने स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.३० वाजता पश्चिम इराणच्या आसपास त्यांचा मार्ग बदलण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, याबाबत विमान कंपन्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.