धोकादायक मिशन यशस्वी करण्यासाठी ओळखली जाणारी इस्त्रायलची गुप्तचर संघटना मोसादने आणखी एक जगाला थक्क करुन सोडणारा कारनामा करुन दाखवला आहे. मोसादच्या एजंटसनी इराणची राजधानी तेहरानमध्ये जाऊन इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पाची इत्यंभूत माहिती चोरली. यावर्षी जानेवारी महिन्यात मोसादने हे धोकादायक ऑपरेशन केले. जी माहिती हाती लागलीय त्यावरुन इराण पुन्हा अण्वस्त्रे बनवण्याच्या तयारीत होता असे न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतील एक आघाडीचे वर्तमानपत्र असून त्यांच्या एका पत्रकाराने ही सर्व कागदपत्रे पाहिली आहेत. या धाडसी मिशनमध्ये मोसादच्या एजंटसच्या हाती अण्वस्त्र प्रकल्पासंदर्भात ५० हजार पाने आणि १६३ डिस्क लागल्या. ज्यामध्ये व्हिडिओ आणि आराखडे आहेत. अमेरिकेने २०१५ साली इराणबरोबर केलेला अणवस्त्र करार मोडण्याआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या ऑपरेशनची आणि त्यातून हाती लागलेल्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली.
इराणने आपला अणवस्त्र प्रकल्पावर नियंत्रण आणण्याच्या मोबदल्यात त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. ३१ जानेवारीच्या रात्री मोसादचे एजंटस तेहरामध्ये प्रकल्पाची माहिती ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आली होती तिथे घुसले. इस्त्रालयने वर्षभरापासून या ठिकाणी पाळत ठेवली होती. मोसादच्या एजंटसनी दोन दार फोडून वेअरहाऊसमध्ये आत प्रवेश केला व अलार्म्स निकामी केले. त्यानंतर त्यांनी आतमधील अनेक कपाट फोडून त्यातील कागदपत्र हस्तगत केली.
इराणचे सुरक्षा रक्षक सकाळी सात वाजेपर्यंत येतात याची त्यांना माहिती होती. सकाळी कामावर आल्यानंतर इथे चोरी झालीय हे लगेच त्यांना समजणार. म्हणून पहाटे पाच वाजण्याच्या आत तिथून बाहेर पडण्याच्या सूचना एजंटसना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोसादच्या एजंटसनी ६ तास २९ मिनिटात हे मिशन फत्ते केले व योजनेनुसार सुरक्षित देशाबाहेर निघाले.
मागच्या आठवडयात इस्त्रालयने सरकारच्या निमंत्रणावरुन तीन पत्रकार तिथे गेले. त्यात न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराचा समावेश होता. त्यावेळी त्यांना ही गोपनीय कागदपत्रे दाखवण्यात आली. इस्त्रालयने दाखवलेल्या कागदपत्रांची विश्वसनियता स्वतंत्रपणे तपासणे अशक्य असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.