Israel Hamas War military Orders to Evacuate Rafah : इस्रायल व हमासमधील युद्धबंदीचा कालावधी संपल्यानंतर ती वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा किंवा करार झालेला नाही. त्यामुळे इस्रायलकडून गाझा पट्टीत लष्करी कारवाया सुरू झाल्या आहेत. इस्रायलचे गाजा पट्टीत हल्ले चालू आहेत. हमासनेही त्यांच्या कारवाया थांबवलेल्या नाहीत. आज (३१ मार्च) ईदच्या दिवशी देखील इस्रायलचे हल्ले थांबलेले नाहीत. मुस्लीम धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या रमजान-ईदच्या दिवशी इस्रायलने राफा शहरातील रहिवाशांना शहर रिकामं करण्याचा इशारा दिला आहे. शहर रिकामं करा अन्यथा तुमचा जीव धोक्यात येईल, असं इस्रायलने म्हटलं आहे.

इस्रायलच्या इशाऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे की बिन्यामिन नेतान्याहूंचं सरकार तिथल्या सैन्याला गाजा पट्टीत, राफा शहरात कारवाया करण्याचे आदेश देऊ शकतं.

राफा शहराचा अन्न, औषधे व इंधनपुरवठा खंडित

इस्रायल व हमासमधील युद्धविरामाचा करार गेल्या महिन्यात संपला आणि हा युद्धविराम वाढवण्याबाबत दोन्ही बाजूच्या लोकांनी प्रयत्न केले नाहीत. उलट २० लाख लोकांना पुरवली जाणारी मूलभूत मदत मार्च महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने खंडित केली ती अजूनही बंद आहे. अन्न, औषधे व इंधनाचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गाझामधील स्थिती पाहता युद्धबंदीच्या कराराचा इस्रायल व हमासमधील परिस्थिती सुधारण्यास हातभार लागलेला दिसत नाही.

गाझापट्टीत इस्रायलचे हल्ले चालू असतानाच आता इस्रायलने संपूर्ण राफा शहर रिकामं करण्याचा इशारा दिला आहे. मागील दोन दिवसांत राफामधील लष्करी कारवायांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांचे मृतदेह सापडले असून हे इमासशी संबंधित दहशतवादी असल्यांचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांना राफाऐवजी मुवासी शहरात जाण्यास सांगितलं आहे. येथे शेकडो लोक तंबू बांधून राहत आहेत.

गाझा शहराचा संपर्क तुटला

इस्रायलने गेल्या वर्षी मे महिन्यात राफा शहरावर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात शहरातील बराचसा भाग बेचिराख झाला आहे. अनेकांची घरं उद्धवस्त झाली असून पॅलेस्टिनी नागरिक राफाच्या वाळवंटात तंबू बांधून राहत आहेत. राफा व इजिप्तच्या सीमेवर सध्या इस्रायलचं नियंत्रण आहे. गाजा पट्टीचा जगाशी संपर्क साधण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ही सीमा इस्रायलच्या ताब्यात नसते. मात्र, हमासबरोबरच्या युद्धादरम्यान, इस्रायली सैन्याने या सीमेवर नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे आता गाजा शहराचा जगाशी संपर्क तुटला आहे.