एपी, रामल्ला
हमास आणि इस्रायलदरम्यान रविवारपासून युद्धविराम लागू झाल्यानंतर हमासच्या ताब्यातील तीन इस्रायली ओलीस आणि इस्रायलच्या कैदेतील ९० पॅलेस्टिनी नागरिक आपापल्या कुटुंबांकडे परतले. तब्बल १५ महिने युद्ध सुरू असताना ओलिसांचे भवितव्य अधांतरी होते. अखेर ही अनिश्चितता संपुष्टात येऊन हमासने एमिली दमारी, रोमी गोनेन आणि डोरोन स्टाइनब्रेशर या तीन ओलिसांना ‘रेड क्रॉस’कडे सोपवले. तिथून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे नेण्यात आले.
निरपराध ओलीस आणि पॅलेस्टिनींची सुटका झाल्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना सामान्य इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांनी जल्लोष केला. ओलीस व कैदी आपापल्या नातेवाईकांना भेट घेत असताना भावूक वातावरण होते. दरम्यान, इस्रायलचे निर्बंध उठल्यानंतर मानवतावादी मदत घेऊन येणारे ६०० ट्रक उद्ध्वस्त गाझामध्ये दाखल झाले असून आणखी मदतपुरवठा केला जाईल.