इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या युद्धाने जगाला हादरवलं आहे. या युद्धात गेल्या चार दिवसांमध्ये २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) सकाळी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली आणि युद्धाला सुरुवात केली. रॉकेट हल्ल्यापाठोपाठ हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो लोकांची गोळ्या घालून हत्या केली, तर १५० हून अधिक इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला असला तरी गाझा पट्टीपासून ३०० किमी दूर असलेल्या बैरुत शहरात (लेबनानची राजधानी) या हल्ल्याचा कट शिजला होता, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायलने दावा केला आहे की, या हल्ल्याचा कट लेबनानच्या बैरूत शहरात रचला होता. तसेच इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सगळी शस्त्रास्र, दारूगोळा, आणि रॉकेटसह इतर यंत्रसामग्री ही लेबनानने पुरवली होती. शस्त्र मिळाल्यानंतर हमासचे दहशतवादी इस्रायलवर तुटून पडले. लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या मदतीमुळेच हमास हा हल्ला करू शकली. हिजबुल्लाह एका बाजूला हमासला मदत करत आहे, त्याचबरोबर हमासच्या हल्ल्यापाठोपाठ हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनीदेखील इस्रायलवर हल्ला केला. त्यामुळे इस्रायलचं सैन्य एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत आहे.

हिजबुल्लाहने मंगळवारी इस्रायली रणगाड्यांवर क्षेपणास्रं डागली. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने लगेच हा हल्ला आपणच केला असल्याचं जाहीर केलं. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हिजबुल्लाहने या हल्ल्याचं उघडपणे समर्थन केलं आहे. तसेच लेबनानमध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला इराणी सरकार ताकद देत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेत ५०,००० हून अधिक तरुणांचा भरणा आहे.

हे ही वाचा >> इस्रायलमध्ये अमानवी अत्याचार, गाझामध्ये काय परिस्थिती? भारतीय महिलेनं शेअर केला Video!

हिजबुल्लाहने इस्रायलमधील तीन ठिकाणी क्षेपणास्र, मोर्टार आणि बॉम्बहल्ला केला आहे. लेबनानमधून डागण्यात आलेली क्षेपणास्र माउंट दोव्ह प्रांतात कोसळली. तसेच हे हल्ले करून हिजबुल्लाहने एक निवेदन जारी केलं. यात हिजबुल्लाहने म्हटलं आहे की, आम्ही इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायली लोकांनी पॅलेस्टाईनवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी आम्ही पॅलेस्टिनी लोक आणि हमासबरोबर उभे आहोत. दरम्यान, हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनानच्या सीमेवर गोळीबार करून प्रत्युत्तर दिलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine war hamas hezbollah plotted attack in beirut lebanon help of iran asc