पॅलेस्टाईनमध्ये लपून बसलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) सकाळी इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. रॉकेट हल्ल्यामुळे इस्रायलच्या सीमावर्ती भागात अनागोंदी माजली. या अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलच्या सीमेत घुसले व त्यांनी इस्रायली नागरिकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. लोकांवर गोळीबार केला, अनेकांची कत्तल केली. तसेच शेकडो इस्रायली महिलांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती इस्रायल सरकारकडून देण्यात आली आहे. एकीकडे इस्रायलमध्ये या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे गाझा पट्टीत नेमकं काय घडतंय, यासंदर्भातली माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाझा पट्टीत राहणाऱ्या एका भारतीय महिलेने गाझा पट्टीत काय घडतंय याबाबतची माहिती दिली आहे. लुबना नझीर असं या महिलेचं नाव असून ती मूळची भारतातली आहे. लुबना आणि तिचं कुटुंब युद्धग्रस्त गाझा पट्टीत अडकलं आहे. आमच्या कुटुंबाला इथून बाहेर काढा अशी विनंती तिने भारत सरकारकडे केली आहे. दरम्यान, गाझा पट्टीत वीज, पाणी, इंटरनेट सेवा बंद आहे. या महिलेने एलिव्हेटेड इंटरनेटच्या सहाय्याने एक व्हिडीओ संदेश जहीर केला आहे.

या व्हिडीओमध्ये लुबनाने म्हटलं आहे, माझं नाव लुबना नझीर आहे. मी सध्या माझे पती आणि मुलींसमवेत गाझा पट्टीत राहते. मी एक भारतीय नागरिक आहे. आम्ही सध्या इथे एका निष्ठुर युद्धाचा सामना करत आहोत. सर्व काही अवघ्या काहीच क्षणांत उद्ध्वस्त होत आहे. सगळीकडे सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. सध्या माझ्याबरोबर दोन कुटुंबं आहेत, जे त्यांच्या घरातून पळून आले आहेत. त्यांच्या घरातल्या २२ लोकांना एका झटक्यात मारून टाकण्यात आलं. इथे वीज नाही, पाणी नाही, इंटरनेट नाही. मी माझं एलिव्हेटेड इंटरनेट वपरून दूतावासाशी संरर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा >> युद्धाच्या चौथ्या दिवशी इस्रायलच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन, काय झाली चर्चा? मोदी म्हणाले…

लुबनाने म्हटलं आहे की, आम्हाला कुठेही जाता येत नाहीये. कारण गाझा पट्टीत कुठेही सुरक्षित जागा उरलेली नाही. कारण चोहोबाजूला अनांगोंदी माजली आहे. गाझा पट्टी खूप लहान आहे आणि गाझा पट्टीची सर्व बाजूंनी नाकेबंदी झाली आहे. मी आधीच भारताची मदत मागितली आहे. रमाल्लाह येथील भारताच्या प्रतिनिधींनी आम्हाला सुरक्षित स्थळी जाण्यासाठी मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine war indian woman lubna nazir situation in gaza strip asc