Sharad Pawar Israel Palestine War : इस्लायल-पॅलेस्टाईन युद्धाचे संपूर्ण जगभर पडसाद उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जगाची दोन गटांत विभागणी झाली आहे. भारतातली परिस्थितीदेखील वेगळी नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून भारत या युद्धात इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे असा संदेश दिला आहे. परंतु, देशातील काही संघटना आणि पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीदेखील पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना म्हणाले, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यांची भूमिका काहीही असो, परंतु, आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे.
दरम्यान, शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. पीयूष गोयल यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये गोयल यांनी म्हटलं आहे, शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेबाबत अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य करतात तेव्हा ते खूप अस्वस्थ करणारं असतं. जगाच्या कुठल्याही भागात दहशतवादाचा निषेध केला पाहिजे.
पीयूष गोयल म्हणाले, अनेकवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आणि भारताचे संरक्षणमंत्री राहिलेल्या व्यक्तीने दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर इतकं बेजबाबदार वक्तव्य करणं योग्य नाही. शरद पवार हे भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा झोपलेल्या आणि बाटला हाऊस एन्काउंटर घटनेवर अश्रू गाळणाऱ्या सरकारचे सदस्य होते. ही कुजकी मानसिकता थांबायला हवी. मला आशा आहे की आता तरी शरद पवार हे आधी देशाचा विचार करतील.