गेल्या अडीच महिन्यांपासून इस्रायल आणि हमामध्ये युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांचा बळी केला आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पत्नी सारा नेतान्याहू यांनी पोप फ्रान्सिस यांना इस्रायल-हमास युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी विनंती आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची बिनशर्त सुटका करण्यासाठी पोप यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सारा यांनी केली आहे. सारा यांनी पत्रात लिहिलं आहे की, हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. तसेच अनेक नवजात बालकाना जाळलं. तसेच कित्येक इस्रायली महिलांवर बलात्कार केला आहे.
सारा नेतान्याहू यांनी पोप यांच्याकडे विनंती केली आहे की, ओलिसांची कुठल्याही अटी-शर्तींशिवाय सुटका व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. सारा नेतान्याहू यांनी पोप फ्रान्सिस यांना लिहिलेल्या पत्रात हमासने पसरवलेल्या दहशतीचा उल्लेख केला आहे. यासह हमासच्या दहशतवाद्यांनी नवजात बालकांना जाळल्याचा आणि अनेक इस्रायली महिलांवरील बलात्काराचा उल्लेख केला आहे.
हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत सारा नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की, ज्यूंच्या नरसंहारानंतर (हिटलरच्या काळात जर्मनीतील घटना) ही सर्वात वेदनादायी घटना आहे. गेल्या ७८ दिवसांपासून हे अत्याचार चालू आहेत. हमासने अजूनही १२९ पुरूष, महिला आणि लहान मुलांना ओलीस ठेवलं आहे. त्यापैकी बहुसंख्य लोक हे जखमी आणि आजारी आहेत. तसेच उपासमारीने त्रस्त आहेत. त्याचबरोबर त्यांना औषधंदेखील मिळत नाहियेत.
सारा यांनी त्यांच्या पत्रात नोआ अरगामेनी नावाच्या एका ओलीस महिलेचा उल्लेख केला आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून ज्या इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं होतं, त्यात नोआचाही समावेश आहे. नोआची आई स्टोज ४ कॅन्सरशी झुंज देत आहे आणि या मातेला तिच्या अखेरच्या दिवसांत तिच्या लेकीला भेटायचं आहे.
हे ही वाचा >> Israel Hamas War : इस्रायलचे हल्ले चालूच, गाझातील हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील ७६ सदस्यांचा बळी
या पत्राच्या शेवटी सारा यांनी म्हटलं आहे की, मी तुम्हाला (पोप फ्रान्सिस) वैयक्तिकरित्या या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करते आणि ओलिसांची सुटका करण्यासाठी तुमचा प्रभाव वापरावा, अशी इच्छा व्यक्त करते.