गेल्या पाच दिवसांपासून इस्रायल-हमास संघर्ष विकोपाला गेला आहे. शनिवारी सकाळी हमास या दहशतवादी संघटनेनं गाझा पट्टीतून इस्रायलच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले चढवले. इस्रायल सरकारच्या माहितीनुसार, या रॉकेट्सची संध्या जवळपास साडेतीन हजाराहून जास्त आहे. त्यापाठोपाठ इस्रायलनंही युद्धाची घोषणा करून हमासच्या गाझामधील तळांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये दोन्ही बाजूच्या सामान्य नागरिकांचे बळी जात असल्याचं दुर्दैवी दृष्य सध्या इस्रायल-गाझा सीमाभागात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टाईनला सज्जड दम भरला आहे.

नेमकं काय घडतंय गाझा पट्टीत?

शनिवारी हमासनं इस्रायलवर हल्ला चढवल्यानंतर पाठोपाठ इस्रायलनंही प्रत्युत्तरादाखल हल्ला चढवला. हमासनं रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये जमिनीवरून मोठ्या संख्येनं दहशतवादी घुसवले. या दहशतवाद्यांनी सामान्य इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. इस्रायली महिलांवर बलात्कार केल्याच्या असंख्य घटना सध्या सीमाभागात घडत आहेत. या धुमश्चक्रीमध्ये आत्तापर्यंत दोन्ही बाजूचे मिळून अडीच हजार सामान्य नागरिक, सैनिक बळी गेले आहेत. असंख्य नागरिक व सैनिक जखमीही झाले आहेत.

बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

दरम्यान, वारंवार सांगूनही हमास माघार घेत नसल्याचं पाहून इस्रायली सैन्य सीमाभागात उतरलं आणि त्यांनी हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत सीमाभागातील इस्रायली भूमीवरून हमासच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. मात्र, हमासकडून हवाई हल्ले अजूनही चालूच आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला परखड शब्दांत इशारा दिला आहे.

हैफाची लढाई: इस्रायलच्या निर्मितीत भारतीय सैनिकांचा ‘तो’ लढा ठरला निर्णायक !

“इस्रायल हमासला चिरडून टाकेल. हमासचं अस्तित्व उद्ध्वस्त करून टाकेल. आम्ही असंख्य मुलामुलींचे मृतदेह जमिनीवर पडलेले पाहिले. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला व पुरुषांना जिवंत जाळून टाकण्यात आलं. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करण्यात आले, त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. इस्रायली सैनिकाचं डोकं छाटण्यात आलं”, अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहूंनी इस्रायलमधील परिस्थिती विशद केली.

हमासची ISIS शी तुलना!

दरम्यान, बेंजामिन नेतन्याहूंनी हमासची तुलना ISIS शी केली आहे. एक्सवर (ट्विटर) नेतान्याहूंनी पोस्ट केली असून त्यात आयसिसचा उल्लेख केला आहे. “हमास हे आयसिस आहे. जगानं ज्याप्रकारे आयसिसचा खात्मा केला आहे, त्याचप्रमाणे आम्ही हमासला चिरडून टाकू, त्यांचा खात्मा करू”, असं नेतान्याहूंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader