इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यास आज बरोबर एक महिना पूर्ण झाला. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रे डागून हल्ला चढवला होता. त्यानंतर, इस्रायलनेही युद्धाची घोषणा करून हमासला प्रत्युत्तर दिलं. तसंच, सातत्याने गाझा पट्टीवरीही हवाई हल्ले केले. परिणामी गाझा पट्टीर मानवतावादी सुविधांची कमतरता निर्माण झाली असून सुरक्षाही धोक्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे दोन संकेत चर्चेचा विषय राहिले आहेत.
गाझा पट्टीतील जखमींना आणि बेघरांना मदत मिळावी यासाठी कारवाई सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी इजिप्त सीमेवरील एक ठाणे खुले करण्यात आले. यामुळे वैद्यकीय आणि इतर स्वरूपाची मदत सामग्री गाझात पोहोचू लागली असली, तरी युद्धविराम घोषित न झाल्यामुळे ही मदत त्रोटक ठरू लागली आहे. त्यामुळे युद्धविराम घेऊन गाझातील नागरिकांना मदत पुरवण्याचं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलं होतं. परंतु, युद्धविरामाची सूचना इस्रायलने नाकारली असून ओलिसांना सोडत नाही तोवर युद्धविराम अशक्य असल्याची भूमिका घेतली आहे. परंतु, गाझातील नागरिकांना मदत पुरवण्यासाठी काही काळ युद्धविश्रांती घेतली जाऊ शकेल, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय. त्यामुळे, नेतान्याहू यांनी खरेच युद्धादरम्यान ब्रेक घेतल्यास गाझातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
हेही वाचा >> विश्लेषण : इस्रायल-हमास संघर्षाचा एक महिना… युद्धविरामाची शक्यता नाही? इस्रायलच्या रेट्यासमोर सारेच हतबल?
तसंच, एका मुलाखतीत त्यांनी गाझाच्या सुरक्षेबाबतही वक्तव्य केलं आहे. युद्ध संपल्यानंतर गाझावर कोणाचा हक्क असेल? तिथं कोण सुरक्षा पुरवेल? असा प्रश्न बेंजामिन यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, युद्ध संपल्यानंतर अनिश्चित काळासाठी गाझा पट्टीवर इस्रायलकडून सुरक्षा पुरवली जाऊ शकते.
सोमवारीही हल्ले
इस्रायलने गाझाच्या वेढा दिलेल्या भागावरील हल्ले आणखी तीव्र केले असून त्यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तर, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी २४ तासांच्या कालावधीत हमासशी संबंधित ४५० ठिकाणांवर हल्ला केला आणि त्यांची काही जागा ताब्यात घेतली अशी माहिती इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिली.
मृतांची संख्या किती?
इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टिनी मृतांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली आहे. यामध्ये ४ हजार १०० हून अधिक मुलांचा समावेश आहे. गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयानुसार वेस्ट बँकमध्ये हिंसाचार आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये १४० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.