इस्रायलच्या सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यात जेरूसलेममधील अल-अकसा मशिदीतील नमाज अदा करणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर हिंसाचार उफाळून आला होता. दरम्यान गाझाच्या सीमेवरच्या भूमीवर लढा देण्यासाठी इस्राईलने आपले सैन्य पाठवले आहे. एएफपीच्या अहवालानुसार, इस्रायली हल्ल्याच्या धमकीमुळे बरेच लोक गाझामध्ये घरे सोडून जात आहेत.
आतापर्यंत दोन्ही गटांमधील लढाई फक्त हवाई हल्ले आणि रॉकेट गोळीबारापर्यंत मर्यादित होती, परंतु आता इस्रायलने जमिनीवर लढायला सैन्य पाठवले असून त्यामुळे युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे. इस्त्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “इस्त्रायली विमान आणि जमिनीवरून सैन्य गाझा पट्टीवर हल्ला करीत आहेत.” इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते जॉन कॉनरिकस यांनीही याची पुष्टी केली आहे.
इस्रायली सैन्याने सांगितले की, शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात सैन्य आणि हवाई दल यांचा सहभाग होता, परंतु सैन्याने गाझामध्ये प्रवेश केला नव्हता. बीबीसीच्या अहवालानुसार गाझा सीमेवर लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरव्दारे तीव्र हल्ले होत आहेत. तेथे जोरदार गोळीबार सुद्धा सुरू आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी सकाळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॅलेस्टाईन अतिरेक्यांविरूद्ध इस्त्राईलची लष्करी कारवाई आवश्यकता असेपर्यंत सुरू राहील. नेतान्याहू म्हणाले की, गाझाची इस्लामिक संस्था हमास त्याची मोठी किंमत मोजेल. तसेच हमास सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, जर इस्त्रायली सैन्याने जमिनीवर लढाई सुरू केली तर त्यांची संघटना त्यांना कठोर धडा शिकवण्यास तयार आहे.
Explained: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष का सुरु आहे?; जाणून घ्या चार प्रमुख कारणं
खरं तर, पॅलेस्टाईन आणि इस्त्रायली सुरक्षा दलांमधील चकमक १० मेपासून जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत सुरू झाली. त्यात १२ पॅलेस्टिनी आंदोलक जखमी झाले. इस्राईलने पूर्व जेरुसलेममधील शेख जर्रा येथून पॅलेस्टाईन कुटुंबांना काढून टाकण्याच्या योजनेमुळे पॅलेस्टाईन लोकही संतप्त झाले. त्यामुळे पॅलेस्टाईन अतिरेकी गट इस्त्राईल येथे रॉकेट हल्ले करत आहे. परंतु इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझाला जेवढे नुकसान होत आहे. तेवढे नुकसान इस्त्राईलची क्षेपणास्त्र यंत्रणांना होत नाही आहे.
इस्त्रायली हवाई हल्ल्यात गाझामध्ये बर्याच प्रमाणात विनाश झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गाझावर झालेल्या इस्त्रायली हल्ल्यात कमीतकमी ८३ जण ठार झाले असून यामध्ये १७ मुलांचा समावेश आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायली हल्ल्यात शेकडो जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्रायलच्या गाझावरील नवीन हल्ल्यात ६ मजली इमारत कोसळली. हे इमारत पॅलेस्टाईनच्या अतिरेकी गट हमासचे स्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. हवाई हल्ल्यात कोसळलेल्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले २० वर्षीय मजदूर असद अक्रम म्हणाले, “आमच्याकडे इस्रायली हवाई हल्ले आणि करोना या दोघांचा सामना होत आहे.” आज इस्रायल आणि करोना आमच्यासाठी दोन शत्रू आहेत.