जगभरात ज्या हेरखात्याचा डंका वाजतो, जगभरातल्या दहशतवादी संघटना ज्या देशाच्या हेरखात्यासमोर दबकून असतात अशा इस्रायलच्या मोसादने मोठा पराक्रम केला आहे. ज्यूंविरोधातला सायप्रसमधील मोठा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी मोसादच्या हेरांनी थेट इराणमध्ये घुसून दहशतवादी संघटनेच्या मास्टरमाईंडचं अपहरण केलं आहे. दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या मास्टरमाईंडचं नाव युसेफ शाहबाजी अब्बासलिलू असं आहे.
दरम्यान, मोसादने याबाबत एक निवदेन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, इराणच्या हद्दीत जाऊन मोसादने एक धाडसी मोहीम फत्ते केली आहे. याअंतर्गत मोसादने एका दहशतवादी संघटनेतील मास्टरमाईंडला पकडलं आहे. तसेच त्यानंतरच्या चौकशीत त्याने त्याच्या दहशतवादी कटाची कबुली दिली आहे. या मोहिमेद्वारे मोसादने पुन्हा एकदा इराणमधल्या एका दहशतवादी सेलचा पर्दाफाश केला आहे. तसेच मोसादने म्हटलं आहे की, इराण असो वा आणखी कुठलं ठिकाण, जगात कुठेही ज्यू अथवा इस्रायली नागरिकांविरोधात कोणी दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल तर आमचे हात अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील.
मोसादने म्हटलं आहे की, इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) वरिष्ठ सदस्यांकडून अब्बासलिलू याला तपशीलवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेत त्याला शस्त्रास्त्रेही मिळाली होती. हा कट कसा असेल, तसेच त्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे कुठे मिळतील यासंबंधीची माहितीही त्याला देण्यात आली होती. अब्बासलिलूला पकडल्यानंतर त्याच्याकडून जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मोसादने सायप्रसच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. सायप्रसच्या सुरक्षा दलानेही या दहशतवादी संघटनेच्या अनेक सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने अब्बासलिलू रिव्हॉल्युशनरी गार्डच्या सदस्यांबरोबर झालेल्या संभाषणाची माहिती देतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हे ही वाचा >> वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे १७ वर्षांचा मुलगा पोलिसांकडून ठार, फ्रान्समध्ये नागरिकांकडून सलग तिसऱ्या दिवशी जाळपोळ, दगडफेक सुरूच
जेरुसलेम पोस्ट आणि फाइल न्यूजने रविवारी एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, इराणमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून ज्यूंवर होणारा नियोजित हल्ला मोसाद आणि सायप्रसने हाणून पाडला आहे. इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हल्ल्याचा कट रचला होता असं जेरुसलेम पोस्टने म्हटलं आहे. मोसादने सायप्रस आणि पाश्चात्य देशांमधील त्यांच्या साधीदारांच्या मदतीने हा हल्ला उधळून लावला आहे. यात अमेरिकेनेही मोसादची मदत केल्याचं सांगितलं जात आहे.