बैरुत : इस्रायलने बैरुतच्या दक्षिणेकडील भागांत शुक्रवारी जोरदार हवाई हल्ले केले. लेबनॉनमधून सीरियामध्ये जाणारा मार्ग या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झाला. हल्ल्याचा इशारा इस्रायलने गुरुवारी दिली होता. हेजबोलाने या ठिकाणाहून लष्करी साहित्य सीरियामध्ये नेण्याचा प्रयत्न केल्याचे इस्रायलच्या लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. या हल्ल्यातून वाचण्यासाठी हजारो नागरिकदेखील या मार्गाचा वापर करीत होते. त्यांच्यासमोर पायी जाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही.
हेही वाचा >>> छत्तीसगडमध्ये ४० नक्षलवादी ठार; अबूझमाडच्या जंगलात मोठ्या घातपाताचा कट उधळला
हेजबोला गटाला सीरियामार्गे इराणकडून शस्त्रांची मोठी मदत मिळत असल्याचे मानले जाते. सीरियातही हा गट सक्रिय आहे. तेथे सीरियाचे अध्यक्ष असाद यांच्यासाठी ते लढत आहेत. लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागातील नागरिकांना संबंधित क्षेत्र रिकामे करण्याचा इशारा इस्रायलने गुरुवारी दिला होता. त्यानंतर शुक्रवारी या भागावर जोरदार हवाई हल्ले केले.
इस्रायलच्या या हवाई हल्ल्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. काही किलोमीटर अंतरांवरील इमारतींना या हल्ल्यांच्या आवाजांनी धक्के बसले. या हल्ल्यामागील उद्देश इस्रायलने स्पष्ट केलेला नाही.
‘गरज पडली, तर आणखी हल्ले करू’
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे समर्थन केले. तसेच गरज पडली, तर आणखी हल्ले करून अशी धमकीही दिली आहे. तेहरानमध्ये शुक्रवारची प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी हजारो लोकांशी संवाद साधला.