Gaza Strip: हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या ओलिसांना सोडले नाही आणि युद्धबंदीचे वचन पाळले नाही, असे कारण देत इस्रायली सैन्याने गाझामध्ये पुन्हा कारवाई सुरू केली आहे. आता एका इस्रायली मंत्र्याने लष्कराला गाझा पट्टीत कायमस्वरूपी व्याप क्षेत्र तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या मंत्र्याने इस्रायली संरक्षण दलांना गाझामधील आणखी जमीन ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
गाझा पट्टीत इस्रायली सैन्याने केलेल्या ताज्या लष्करी कारवाईमुळे या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. गेल्या तीन दिवसांत इस्रायली हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये जवळपास ६०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
इस्रायलच्या ताज्या हल्ल्यांत शेकडो लोकांचा मृत्यू
इस्रायली सैन्याने गाझाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागात एकाच वेळी हल्ला केला आहे, त्यानंतर या भागातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, दक्षिण गाझामधील रफाहवर जमीनी हल्ला सुरू आहे आणि सैन्य उत्तरेकडे बेत लाहिया शहर आणि मध्य भागांकडे सरकत आहे. जानेवारी २०२५ मध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर युद्धबंदीचा भंग झाल्यानंतर हा हल्ला झाला. त्यामुळे गाझात गेली दोन महिने असलेली शांतता संपुष्टात आली आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपासून सुरू झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत आणि हजारो जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या बॉम्बहल्ल्यांमध्ये ४०० हून अधिक लोक मारले गेले असून, तेव्हापासून मृतांचा आकडा वेगाने वाढत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
हमासच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. पण, स्थानिकांचे म्हणणे आहे की, हल्ल्यांमध्ये नागरिकांची घरे आणि वस्त्या देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
२०२३ पासून इस्रायल-हमास संघर्ष
गाझा पट्टीत सध्या सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, आणि तणाव खूपच तीव्र झाला आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अनेक इस्राईली नागरिकांना जीव गमवावा लागला. याचबरोबर हमासने शेकडो इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले होते. त्यानंतर, इस्रायलने गाझा पट्टीत हमासच्या तळांवर हल्ले सुरू केले, आणि या संघर्षाने आणखी तीव्र व हिंसक रूप घेतले.
गाझा आणि इस्रायलमधील नागरिक या युद्धामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत अडकले आहेत. गाझा पट्टीतील नागरिकांना अन्न, पाणी, आणि औषधांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तर, इस्रायलमधील नागरिक देखील सुरक्षेच्या कारणांमुळे घराबाहेर पडू शकत नाहीत.