Israel allegedly Planned Hezbollah Lebanon Pager Attack : लेबनॉनमध्ये मंगळवारी (१८ सप्टेंबर) पेजर्सचे साखळी स्फोट झाले. यात हेझबोलाच्या शेकडो दहशतवाद्यांसह संपूर्ण देशात २,८०० लोक जखमी झाले. तसेच नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ बुधवारी पुन्हा एकदा लेबनॉन हादरलं. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हेझबोलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की “वॉकी-टॉकी आणि सौर उपकरणांमध्ये देखील स्फोट झाले आहेत”. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हे स्फोट घडवून आणल्याचे दावे सुरुवातीला केले जात होते. मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसर इस्रायलची गुप्तचर सायबर शाखा ‘युनिट ८२००’ने हे हल्ले घडवून आणले आहेत. ही संस्था इस्रायलच्या मोसादपेक्षा वेगळी आहे.
रॉयटर्सने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की सायबर युद्धांमध्ये इस्रायलचा मोर्चा सांभाळणारी गुप्तचर यंत्रणा युनिट-८२०० ने हेझबोलावर हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, इस्रायलने मात्र या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सूत्रांनी सांगितलं की युनिट-८२०० ही सायबर संस्था पेजर्स व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाली होती. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटकं बसवणे, रिमोट-कंट्रोलद्वारे त्यांचं नियंत्रण मिळवणे व एकाच वेळी त्यांचा स्फोट घडवून आणणे या तिन्ही गोष्टींवर ‘युनिट-८२००’ ने अनेक महिने काम केलं होतं.
हे ही वाचा >> Lebanon Explosion : लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी
माजी गुप्तचर अधिकारी आणि इस्रायलच्या डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरमचे रिसर्च डायरेक्टर योसी कुपरवासर यांनी रॉयटर्सला सांगितलं की या हल्ल्यात लष्करी गुप्तचर संस्थेचा किंवा ‘युनिट’चा (युनिट-८२००) चा कसलाही सहभाग नाही. युनिट ८२०० मधील सदस्य हे त्यांच्या क्षेत्रातले तगडे व गुणी कर्मचारी आहेत. इस्रायलची संरक्षण क्षमता, सायबर सुरक्षा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
हे ही वाचा >> Lebanon Pager Blast : इस्रायलच्या युनीट ८२०० ने साध्या पेजरचं विध्वंसक अस्त्रात कसं केलं रुपांतर? हेझबोलाचे धाबे दणाणले
युनिट-८२०० ही संस्था कशा पद्धतीने काम करते?
युनिट ८२०० व या संस्थेतील कर्मचारी शत्रू राष्ट्रांची माहिती गोळा करणे, ती माहिती गुप्तचर यंत्रणा व संरक्षण यंत्रणांना पुरवणे, त्या माहितीचं विश्लेषण करणे, सायबर सुरक्षा पुरवणे यांसारखी कामे करतात. या युनिटची थेट यूएस नॅशनल सिक्योरिटी एजन्सीशी तुलना केली जाते. इस्रयली सरकार युनिट-८२०० च्या कारवाया व मोहिमांबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर पडू देत नाही.