एपी, तेल अवीव/बैरुत

इस्रायलने लेबनॉनमध्ये हेजबोला गटावर हल्ले सुरूच ठेवले असून, शस्त्रसंधीची कुठल्याही प्रकारची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि मित्रदेशांनी २१ दिवसांच्या शस्त्रसंधीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन केल्यानंतरही हा हल्ला करण्यात आला. इस्रायलने जमिनीवरून हल्ला करण्याचीही धमकी दिली आहे. हेजबोलाबरोबरील संघर्षात आतापर्यंत सहाशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेसह मित्रदेशांनी केलेले आवाहन हा एक प्रस्ताव असल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. संयुक्ता राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी जात असताना नेतान्याहू यांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. शस्त्रसंधीची शक्यता इस्रायलने फेटाळून लावल्यामुळे हेजबोला गटाबरोबरील युद्धाचे ढग कायम राहिले आहेत. हेजबोला गटानेही शस्त्रसंधीवर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. गाझा पट्टीत शस्त्रसंधी करार झाला, तरच हल्ले थांबवू, असे हेजबोलाने म्हटले आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्राईल कॅत्झ यांनीही पूर्ण विजय मिळेपर्यंत लढाई सुरू राहील, असे म्हटले आहे. सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत गाझा पट्टीतील संघर्ष सुरूच राहील, असे नेतान्याहू यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटल्यामुळे हा संघर्षाची समस्या कायम राहणार आहे.

हेही वाचा >>>जगाचं काही खरं नाही: एकीकडे रशियाची अण्वस्त्रांची धमकी, दुसरीकडे अमेरिकेचा युक्रेनला ८ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात २३ ठार

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सीरियाचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय असलेली इमारत उद्ध्वस्त झाली. यात 23 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महिला आणि मुलांचा अधिक करून समावेश आहे. लेबनॉन-सीरियाच्या सीमावर्ती भागात हा हल्ला करण्यात आला. हेजबोलाविरोधातील गेल्या काही दिवसांतील हा सर्वांत मोठा हल्ला होता.