‘हमास’च्या युद्धखोरीच्या वृत्तीपुढे आमचा नाइलाज आहे. गेले नऊ दिवस कोसळणारे बॉम्ब काही तासांसाठी बंद झाले होते. ते आता नव्याने बरसू लागतील. त्यामुळे गाझावासीयांनो, आपापली घरे सोडा आणि सुरक्षित जागा शोधा, अशी इशारेवजा सूचना बुधवारी इस्रायलने दिल्याने गाझातील नरसंहाराचे ढग नव्याने गडद होऊ लागले आहेत. इस्रालयने हवाई हल्ल्यांबरोबरच लष्करी दलांचा वापर करण्याचा इशारा पॅलेस्टिनींना दिला असून, आजवरच्या हल्ल्यांत बळी गेलेल्यांची संख्या २०८ वर पोहोचली आहे.
इजिप्तने ठेवलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर ‘हमास’ने मंगळवारी रात्रभर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरूच ठेवले. इजिप्त प्रस्तावित शस्त्रसंधी ही शरणागती असून पॅलेस्टिनी लोकांना नामोहरम करण्यासाठीचा कुटिल डाव असल्याचा आरोप ‘हमास’च्या प्रमुख नेत्यांनी केला होता. त्यानंतर ‘हमास’ने रॉकेट आणि तोफांचा हल्ला सुरू ठेवला. नऊ दिवस सुरू असलेल्या संहारात पॅलेस्टिनी बहुसंख्य नागरिकांचा बळी गेला असताना, मंगळवारी झालेल्या हल्ल्यात इस्रायलचा एकमेव नागरिक ठार झाला. ‘हमास’ने एर क्रॉसिंगवर मध्यरात्री हा हल्ला केला होता. सोमवापर्यंत पॅलेस्टिनी मृतांचा आकडा १९८ वर होता. मंगळवारी रात्री इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आणखी १० जण ठार झाले, तर १००० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सर्वाधिक बळी पॅलेस्टिनमधील निरपराध नागरिक आहेत, असा आरोप या अधिकाऱ्यांनी केला. तर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ‘हमास’चे नेते नागरिकांचा ढाल म्हणून वापरत करत असल्याचा आरोप इस्रायली नेत्यांनी केला आहे.
हमासला शांतता नकोय
बुधवारी पहाटेपासून आम्ही हल्ले थांबवल्यानंतरही ‘हमास’ने इस्रायलच्या दिशेने ४७ रॉकेट डागली, परिणामी आम्हाला ‘हमास’विरोधात कारवाईला प्रारंभ करावा लागल्याचे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने ट्विटरवर स्पष्ट केले. इजिप्तच्या वतीने आलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव ‘हमास’ आणि इस्लामिक जिहादींनी फेटाळला आणि इस्रायलच्या दिशेने डझनहून अधिक रॉकेट डागल्याचे प्रवक्त्याने म्हटले. गाझापट्टीतील दहशतवादी तळांवरून करण्यात येत असलेल्या कारवायांना नेस्तनाबूत करण्यासाठी लष्करी कारवाई अधिक कडक करा, असा आदेश बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी सैन्याला दिला. त्यानंतर सैन्याने हल्ला सुरू झाली.