इस्रायलने हमासच्या तीनशे ठिकाणांवर हवाई हल्ले केले असून त्यात ३१ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील प्राणघातक हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या आता ७५ झाली आहे. नोव्हेंबर २०१२ नंतर इस्रायलने प्रथमच इतके प्राणघातक हल्ले हमासवर केले आहेत.
गाझाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली लष्कराने सोमवारी हमास अतिरेक्यांवर कारवाई सुरू केली. त्यात महिला व मुलेही मारली गेली आहेत.  खान युनूस येथे गुरुवारी सकाळी दक्षिणेकडील खान युनूस भागात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात आठ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी एका कॅफेवर करण्यात आलेल्या  हल्ल्यात नऊ जण ठार झाले आहेत.  पश्चिम गाझा येथे एका मोटारीवर हल्ला करण्यात आला, त्यात तीन जण ठार झाले. इस्रायल लष्कराच्या प्रवक्तयाने सांगितले की, खान युनूस येथे एका घरावर झालेल्या हल्ल्यात काही जण ठार झाले असले तरी घरावर हल्ल्याचा आमचा हेतू नव्हता. इस्रायली संरक्षण दलांनी सांगितले की, ओदेह कावरे हमास या खान युनूस कंपनीच्या कमांडरच्या घरावर हा हल्ला झाला आहे.
पॅलेस्टिनी सूत्रांनी सांगितले की, एकूण २५ लोक या घरावरील हल्ल्यांमध्ये जखमी झाले. हमासच्या वरिष्ठ नेत्यांच्या घरांवर इस्रायलची बॉम्बफेक चालू असल्याचे सांगण्यात येते. इस्रायली लष्कराने हमासच्या रॉकेट हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी प्रोटेक्टिव्ह एज या मोहिमेत ६४ जण ठार झाले असून त्यात १० महिला व १८ मुले आहेत. गाझा येथे ७५० ठिकाणी हल्ले करण्यात आले व त्यात ८०० टन स्फोटके, ३०० रॉकेट इस्रायलने वापरली आहेत.