वृत्तसंस्था, देर-अल-बलाह
इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये तीन बालके आणि हमास संचालित पोलीस दलातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
गाझापट्टीतील मुवासी भागात गुरुवारी पहाटे हे हवाई हल्ले करण्यात आले. या ठिकाणी हजारो विस्थापित नागरिक आश्रय घेत आहेत. मृतांमध्ये तीन बालके, तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याचे स्थानिक रुग्णालयाने माहिती देताना सांगितले. जनरल डायरेक्टर मेजर जनरल महमूद सलाह आणि त्यांचे सहकारी ब्रिगेडियर जनरल होसाम शाहवान या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा : हिंदू नेते चिन्मय दास यांना जामीन देण्यास नकार, बांगलादेशातील चितगाव न्यायालयाचा निर्णय
गाझा पट्टीत हमास संचालित सरकारमध्ये हजारो पोलिसांचा समावेश असून, त्यांनी युद्ध सुरू होण्यापूर्वी येथील सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. परतु इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे, येथील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या वितरणात अडथळा येत असून, अनेक भागातून पोलीसही गायब झाले आहेत. परंतु साध्या पोशाखात हमासचे सुरक्षा कर्मचारी अजूनही बहुतांश भागात गस्त घालत आहेत.
‘अल जझीरा’वरील प्रसारणबंदीचा निषेध
दुबई : पॅलेस्टाईनने ‘वेस्ट बँक’मध्ये प्रसारणास बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा ‘अल जझीरा’ने निषेध केला आहे. पॅलेस्टाईनचा हा निर्णय इस्रायलने केलेल्या समान कारवाईच्या अनुषंगाने असल्याचे ‘अल जझीरा’ने म्हटले आहे. गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात ‘अल जझीरा’ने पाश्चिमात्य प्रदेशांवर ‘व्याप्त प्रदेशातील घटनांबद्दल, विशेषत: जेनिन आणि त्यांच्या छावण्यांमध्ये काय घडत आहे, यामागील सत्य लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पॅलेस्टाईनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आणि भडकावल्याचा आरोप करत पॅलेस्टिनी प्राधिकरणाने बुधवारी ‘अल जझीरा’च्या प्रसारणास स्थगितीचा निर्णय घेतला होता.