इस्रायलचं सैन्य आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्ध अद्याप थांबलेलं नाही. या युद्धामुळे गाझापट्टीत अजूनही धुमश्चक्री चालू आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात अमेरिकास्थित स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी ठार झाले आहेत. चॅरिटी वर्ल्ड सेंट्रल किचन ही स्वयंसेवी संस्था सध्या गाझा पट्टीतल्या रहिवाशांची मदत करत आहे, तिथल्या लोकांना अन्नपुरवठा करत आहे. या संस्थेतील सदस्य शेफ जॉस अँड्रेस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट लिहून गाझातील हल्ल्यात निधन झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अँड्रेस यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वर्ल्ड सेंट्रल किचनने आज आपल्या काही भाऊ-बहिणींना गमावलं आहे. इस्रायलने गाझात केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये आपल्या काही सहकाऱ्यांचं निधन झालं आहे. मी आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँड्रेस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यापूर्वी गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं की, इस्रायली हल्ल्यावेळी एक वाहन लक्ष्य बनलं असून यामध्ये सात परदेशी नागरिक ठार झाले आहेत. तसेच या वाहनाचा पॅलेस्टिनी चालकदेखील मृत्यूमुखी पडला आहे. या आठही जणांचे मृतदेह गाझामधील देर अल-बलाह येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. स्वयंसेवी संस्थेच्या बचाव पथकातील सात जण ठार झाले आहेत. यापैकी एकजण ब्रिटिश, एक ऑस्ट्रेलियन आणि एक पोलिस नागरिक आहे. इतर सहकारी कोणत्या देशाचे नागरिक होते ते अद्याप समजू शकलं नाही. तसेच या हल्ल्यात ठार झालेली आठवी व्यक्ती म्हणजे त्या वाहनाचा चालक आणि दुभाषी होता. हा चालक पॅलेस्टिनी होता.

इस्रायली सैन्याने या घटनेनंतर एक निवेदन जारी केलं आहे. IDF ने निवेदनात म्हटलं आहे की, या दुःखद घटनेमागची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि यामध्ये कोणाची चूक आहे हे शोधण्यासाठी उच्चस्तरीच चौकशी समिती नेमली असून आम्ही या घटनेचा आढावा घेत आहोत.

हे ही वाचा >> कच्चथिवू बेटाच्या वादावर श्रीलंकेचं पहिलं भाष्य; मंत्री म्हणाले, “फक्त सरकार बदललं म्हणून…!”

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि व्यापार विभागाने या घटनेबाबत म्हटलं आहे की, “आम्ही सध्या गाझामध्ये झालेल्या इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात बचाव पथकातील ऑस्ट्रेलियन कर्मचारी ठार झाल्याच्या वृत्ताची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत मिळालेली माहिती अस्वस्थ करणारी आहे.” वर्ल्ड सेंट्रल किचन ही स्वयंसेवी संस्था सायप्रसहून बोटीद्वारे गाझात मदत पोहोचवण्याचं काम करत होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli airstrike on gaza 7 humanitarian aid workers killed says ngo asc