तेल अवीव : इस्रायलचा हमास संघटनेबरोबर झालेल्या शस्त्रसंधी कराराचे स्वागत साऱ्या जगभरातून होत असताना या कराराला इस्रायलने अद्याप मंजुरी दिलेली नाही. हमास करारातील काही तरतुदींबद्दल मागे हटत असून, हमासच्या शेवटच्या क्षणाच्या चालींमुळे करार पूर्णत्वाला येत नसल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिली आहे. दरम्यान, शस्त्रसंधी कराराची घोषणा झाल्यानंतरही गाझा पट्टीत संघर्ष सुरू असून, आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि मध्यस्थाची भूमिका बजावत असलेला कतार यांनी शस्त्रसंधी करार यशस्वी झाल्याची घोषणा केली. मात्र, या करारामध्ये काही मुद्दे असल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले. या कराराच्या अंमलबजावणीला रविवारपासून सुरुवात होणे अपेक्षित आहे. हा करार संकटात आहे, की नेतान्याहूंना त्यांची राजकीय फळी एकसंध ठेवण्यासाठी अशी विधाने करीत आहेत, हे कळायला मार्ग नाही. अपहृतांना पुन्हा इस्रायलमध्ये आणण्यासाठी नेतान्याहू यांच्यावर मोठा दबाव आहे. मात्र, हमासला खूप सवलती दिल्या, तर सरकार पाडू, असा इशारा त्यांच्या मित्रपक्षांनी दिला आहे.
हेही वाचा >>> इस्रोकडून अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी; अमेरिका, रशिया, चीननंतर भारताचा यशस्वी प्रयोग
नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले, की कराराला मंजुरी देण्यासाठी कॅबिनेटची बैठक झालेली नाही. जोपर्यंत हमास पूर्ण माघार घेत नाही तोपर्यंत मंजुरीची शक्यता कमी आहे. करारातील काही मुद्द्यांवर हमास पुन्हा मागे फिरला आहे. हमासला आणखी सवलती हव्या आहेत, असे आरोप करण्यात आले.
हमासचा म्होरक्या इज्जत-अल-रिश्क म्हणाला, ‘शस्त्रसंधी करारासाठी हमास कटिबद्ध आहे.’ या कराराची घोषणा बुधवारी झाली. या करारानुसार गाझा पट्टीतील अपहृतांची सुटका करणार आहे.
४६ हजारांहून अधिक मृत्यू
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यात १२००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. २५०हून अधिक जणांना हमासने ओलीस ठेवले. इस्रायलने हमासच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा यात मृत्यू झाला आहे. यातील निम्म्याहून अधिक मुले आणि महिला असल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हमासच्या १७ हजारांहून अधिक म्होरक्यांचा खात्मा केल्याची माहिती इस्रायलने दिली.