Israeli Fighter Jet Bomb Attack near Gaza Border : गाझामध्ये गेल्या १८ महिन्यांपासून इस्रायली वायूदल बॉम्बवर्षाव करत आहे. पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासकडूनही इस्रायलवरील हल्ले थांबलेले नाहीत. या दीड वर्षांनंतरही इस्रायल-हमास युद्ध थांबलेलं नाही. दरम्यान, मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री गाझाच्या सीमेजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. इस्रायली सैन्याने सीमेनजिकच्या इस्रायली वस्तीवर बॉम्ब टाकला. या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) म्हटलं आहे की तांत्रिक बिघाडामुळे ही चूक झाली.
दुसऱ्या बाजूला, आयडीएफच्या या चुकीमुळे सीमेनजिक राहणाऱ्या इस्रायली नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.सीमेच्या अलीकडे दोन मैल अंतरावर दक्षिण गाझामधील नीर यित्जाक किबुत्झजवळ हा बॉम्ब पडला. याबाबत इस्रायली सैन्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की काही वेळापूर्वी एका इस्रायली लष्करी विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे यित्जाक किबुत्झजवळच्या मोकळ्या जागेत एक बॉम्ब पडला आहे. गाझाच्या मोहीमेवर असताना या विमानातून बॉम्ब पडला.
बॉम्ब रहिवासी भागात पडला नाही : इस्रायली सैन्य
या बॉम्बस्फोटात जीवितहानी झाली आहे का, किंवा किती वित्तहानी झाली आहे याबाबत आयडीएफने कोणतीही माहिती दिलेली नाही. नीर यित्जाक भागात ५५० च्या आसपास ज्यू लोक राहतात. बॉम्ह रहिवासी भागात पडला नाही असं आयडीएफने म्हटलं आहे. रहिवासी भागात बॉम्ब पडला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं. दरम्यान, आयडीएफने म्हटलं आहे की आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. तसेच याप्रकरणी चौकशी देखील चालू आहे.
जिथे हमासने हल्ला केला होता, त्याच भागात आयडीएफचा बॉम्ब पडला
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सीमेत घुसून सीमेनजिक राहणाऱ्या लोकांवर हल्ले केले होते. तसेच शेकडो लोकांचं अपहरण केलं होतं. त्यावेळी हमासने नीर यित्जाकवर हल्ला केला होता. त्यामुळे या भागात राहणारे लोक गेल्या दीड वर्षांपासून भितीदायक वातावरणात राहत आहेत. अशातच काल रात्री त्यांच्या वस्तीजवळ बॉम्ब पडल्याने त्यांची भिती आणखी वाढली आहे. हमासच्या हल्ल्यानंतर येथील किबुत्झ समुदायाच्या लोकांनी तिथून पलायन केलं होतं. मात्र, अलीकडेच हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं आहे, तसेच युद्ध काही काळ थांबलं होतं. त्यामुळे किबुत्झ सुमदायातील अर्ध्याहून अधिक लोक स्वगृही परतले आहेत. मात्र, सध्या त्यांच्या भितीचं वातावरण आहे.