जेरुसलेम : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर भारतात रान उठले असताना इस्रायली दिग्दर्शक नदाव लापिड मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत. ‘चित्रपटांच्या माध्यमातून केला जाणारा प्रचार मी ओळखू शकतो,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिले आहे.
गोव्यात नुकत्याच झालेल्या इफ्फी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्ष असलेल्या लापिड यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट बटबटीत आणि प्रचारकी असल्याची टीका केली होती. त्यावरून चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेते अनुपम खेर यांच्यासह इस्रायलच्या राजदूतांनीही लापिड यांना लक्ष्य केले होते. या वादानंतर मायदेशी परतलेले लापिड यांनी या वादावर हारेत्झ या इस्रायली वर्तमानपत्राला मुलाखत दिली. ते म्हणाले, ‘‘वाईट चित्रपट बनविणे हा गुन्हा नाही. पण अग्निहोत्री यांचे दिग्दर्शन कच्चे, फेरफार केलेले आणि हिंस्र आहे. ज्युरीचा अध्यक्ष या नात्याने मनात आले ते बोलणे हे माझे कर्तव्य आहे.’’ आगामी काळात इस्रायलमध्येही अशी स्थिती येऊ शकेल आणि एखादा परदेशी ज्युरी अध्यक्ष त्याच्या मनातले बोलला, तर मला आनंदच होईल.’’