इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध अद्यापही संपलेलं नाही. या संघर्षाचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हं आहेत. अशातच हमासकडून जे हल्ले केले गेले जात आहेत त्याविषयीच्या काही कहाण्या समोर येत आहेत. नोम माझेल बेन डेव्हिड या मॉडेलने तिला आलेला धक्कादायक आणि थरारक अनुभव सांगितला आहे. नोम हमासच्या हल्ल्यातून कशीबशी बचावली आहे.
नोम डेव्हिडने काय सांगितलं?
“मी माझ्या प्रियकरासह एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये गेले होते. तिथे हमासचे ते राक्षस आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. मला पायावर आणि कमरेवर गोळी लागली पण मी माझ्या प्रियकराच्या मृतदेहाच्या आड लपून राहिले. प्रचंड वेदना होत होत्या पण मी थोडासा जरी आवाज केला असता तर मला ठार करायला हमासचे ते राक्षस परत आले आहेत. मला होणाऱ्या त्या वेदना मी जवळपास दोन ते अडीच तास सहन केल्या. त्यामुळेच मी वाचले. मात्र माझ्या प्रियकरासह इतर अनेक निष्पाप लोकांची हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केली.
““गाझात दररोज निष्पाप चिमुकल्यांचा बळी जातोय आणि जग…”, दिग्गज माजी भारतीय क्रिकेटपटूची हळहळ
त्या भयंकर दिवसाची भयंकर आठवण
“खरंतर तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता कारण मी माझ्या प्रियकरासह वेळ घालवणार होते. मात्र पुढे नियतीने असं काही वाढून ठेवलं आहे याची मला मुळीच कल्पना नव्हती. त्या दिवसाची ही भयानक आठवण मी कधीही विसरु शकणार नाही. मी सुपरनोव्हा फेस्टला गेले होते. त्यादिवशी आम्ही तिथे आमचं काम करत होतो, त्याचवेळी हे हमासचे दहशतवादी साधारण साडेसहाच्या सुमारास आले. त्यांनी गोळीबार सुरु केला. काय घडतंय हे कळेपर्यंत सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. किंकाळ्या ऐकू येत होत्या. सध्या मी उपचार घेते आहे आणि मला बरंच बरं वाटतं आहे. मात्र माझ्या आयुष्यातला तो काळा दिवस मी कधीही विसरणार नाही.” ७ ऑक्टोबरला ही घटना घडली. express.co.uk ने हे वृत्त दिलं आहे.
मी एका मुलीचं ओरडणं आणि विनवण्या ऐकल्या
“तिथे आलेल्या जवळपास सगळ्या लोकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ठार केलं. मी एका मुलीचं ओरडणं ऐकत होते. ती गयावया करत होती की मला कुठेही घेऊन जाऊ नका मला कृपा करुन सोडून द्या. मात्र त्यांनी तिच्यावर खूप अत्याचार केले आणि नंतर तिला गोळ्या घालून ठार केलं. मी आणि माझा प्रियकर डेव्हिड यांच्यावरही त्यांनी गोळ्या चालवल्या. मी डेव्हिडच्या मृतदेहाच्या मागे लपले आणि निपचित पडून राहिले. हमासच्या दहशतवाद्यांना वाटलं की माझा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी आणखी गोळ्या चालवल्या नाहीत.” असं नोमने सांगितलं आहे.
या फेस्टिव्हलवर हल्ला झाल्याचं कळताच कुणी वाचलं आहे का हे पाहण्यासाठी तिथे इस्रायलचे पोलीस आले. त्यांना नोम ही मॉडेल जखमी अवस्थेत आढळली. त्यांनी तिला लॅनियाडो रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे तिचे प्राण वाचू शकले.