इस्रायल आणि हमासमधील युद्ध अजूनही चालू आहे. आज या युद्धाचा ३४ वा दिवस आहे. हमासचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीत जमिनीवरून कारवाई (ग्राऊंड ऑपरेशन) करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलचं लष्कर गाझाच्या भूमीवर उतरलं आहे. गाझातल्या ज्या-ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ असू शकतात अशा ठिकाणी ते धाडी टाकू लागले आहेत. अशातच इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, पुन्हा एकदा आम्हाला गाझा पट्टीवर ताबा मिळवायचा नाही, किंवा आम्हाला फार काळ गाझावर नियंत्रण ठेवायचं नाही, आमचा तसा कोणताही हेतू नाही. हमासविरोधात पॅलेस्टाईनच्या सीमा भागात आम्ही आक्रमक मोहीम हाती घेतली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इस्रायलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला. या अधिकाऱ्याने आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर काही माहिती वृत्तसंस्थेला दिली. ते अधिकारी म्हणाले, आम्ही सध्या हाती घेतलेली मोहीम यशस्वी होत आहे. आम्ही असेच पुढे सरकत राहू. ही मोहीम कधीपर्यंत चालेल हे आत्ता सांगता येणार नाही. परंतु, आमची ही मोहीम अमर्यादित किंवा मोठ्या काळासाठी नाही. आमची मोहीम ओपन-एंडेड नाही. हमासचा बंदोबस्त करून आम्ही माघारी फिरू.
या अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं की, आमच्या लष्करी कारवाईचं एकमेव उद्दीष्ट आहे. आमच्यावर हल्ला करणाऱ्या आणि आम्हाला धमकावणाऱ्या हमासची ताकद नष्ट करणे हाच आमचा हेतू आहे. आम्हाला कल्पना आहे की या मोहिमेला बराच वेळ लागेल. परंतु, आम्हाला त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधांवर कारवाई करावी लागेल.
दुसऱ्या बाजूला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला एबीसी न्यूज या वृत्तवाहिनीला सांगितलं होतं की, आम्ही अनिश्चित काळासाठी गाझा पट्टी आमच्या नियंत्रणात ठेवू. परंतु, इस्रायलने अद्याप गाझापट्टीसाठीच्या त्यांच्या आगामी काळाील योजनांबद्दल कोणतीही गोष्ट स्पष्ट केलेली नाही.
हे ही वाचा >> VIDEO : पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला, महमूद अब्बास थोडक्यात बचावले
उत्तर गाझामधून पॅलेस्टिनींच्या स्थलांतराला वेग
इस्रायली सैन्याने उत्तर गाझात हवाई आणि जमिनीवरून हल्ल्यांची तीव्रता वाढवल्यानंतर तेथील पॅलेस्टिनी नागरिकांनी स्थलांतर सुरू केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदतीसाठी समन्वय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी जवळपास १५ हजार रहिवाशांनी उत्तर गाझामधून स्थलांतर केलं. सोमवारी पाच हजार, तर रविवारी दोन हजार रहिवाशांनी स्थलांतर केलं होतं.