Israeli PM Netanyahu at UN Shows India map as Blessing : गेल्या वर्षभरापासून इस्रायल व पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमध्ये युद्ध चालू आहे. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हेझबोलाने काही महिन्यांपूर्वी या युद्धात उडी घेतली आहे. त्यामुळे इस्रायली सैन्य एकाच वेळी हमास व हेझबोलाशी दोन हात करत आहे. अशातच इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रविवारी (२९ सप्टेंबर) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या म्हणजेच यूएनजीएच्या ७९ व्या सत्राला संबोधित केलं. महासभेला संबोधित करताना नेतान्याहू यांनी मध्य-पूर्वेत चालू असलेल्या संघर्षासाठी इराणला जबाबदार ठरवलं. तसेच यावेळी त्यांनी दोन नकाशे दाखवले. दोन्ही नकाशांमध्ये वेगवेगळ्या देशांचे समूह रेखाटण्यात आले होते. यापैकी पहिल्या नकाशात इराणसह इतर काही देश दिसत होते. या देशांना त्यांनी The Curse (अभिशाप) म्हटलं आहे. तर दुसऱ्या नकाशात भारतासह इतर काही देश दाखवण्यात आले आहेत. या देशांना नेतान्याहू यांनी The Blessing (आशीर्वाद) म्हटलं आहे. नेतान्याहू यांचं भाषण व त्यांनी या भाषणादरम्यान दाखवलेल्या नकाशांचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

या दोन्ही नकाशांमध्ये पॅलेस्टाइनच्या ताब्यातील वेस्ट बँकचा भाग व गाझा पट्टी पूर्णपणे इस्रायलचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. नेतान्याहू यांच्या उजव्या हातात असलेल्या नकाशामध्ये इराण, सीरिया, येमेन ही राष्ट्रे काळ्या रंगात दाखवण्यात आली होती. वर त्यांना ‘दी कर्स’ (अभिशाप) घोषित केलं होतं. तर त्यांच्या डाव्या हातात इजिप्त, सुदान, सौदी अरब आणि भारत हे देश हिरव्या रंगात रेखाटण्यात आले होते. या देशांना ‘द ब्लेसिंग’ (आशीर्वाद) म्हटलं होतं.

हे ही वाचा >>दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर

विशेष म्हणजे या नकाशांमध्ये सीरियामधील गोलान हाइट्स हा भाग देखील इस्रायलचाच हिस्सा असल्याचं दाखवण्यात आलं आहे. इस्रायलच्या सीमांवरील तणाव, मध्य पूर्वेतील राष्ट्रांबरोबरचे त्यांचे संबंध या सर्व गोष्टींवर नेतान्याहू यांनी यावेळी जोर दिला. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर जगभरातून हमासची निंदा केली गेली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हमासच्या कृत्याचा निषेध नोंदवला होता. भारताने सुरुवातीपासून या युद्धात सामान्य जनतेचा मुद्दा मांडला आहे. तसेच इस्रायल-हमासमधील युद्ध थांबावण्याचं, युद्धविरामाचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा >> S Jaishankar : “पाकिस्तान त्यांच्या कर्माची फळं भोगतोय, आता फक्त पाकव्याप्त काश्मीर…”, एस. जयशंकर यांचं मोठं वक्तव्य

नेतान्याहू नेमकं काय म्हणाले?

बिन्यामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दोन हातात ‘दी कर्स’ व ‘दी ब्लेसिंग’ असे दोन नकाशे दाखवले व म्हणाले, “जगाला आशीर्वाद आणि अभिशाप यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल”. यावेळी नेतान्याहू यांनी इराणवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “इराण सातत्याने दहशतवादी संघटनांना शस्त्रास्र व इतर मदत पुरवत आला आहे. हेच त्यांचं धोरण अजूनही चालू आहे. जगाने अशा देशांचं तुष्टीकरण बंद करावं. तेहरानला (इराणची राजधानी) माझा एक संदेश आहे. तुम्ही आमच्यावर हल्ला कराल, तर आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही. आम्हीसुद्धा तुमच्यावर हल्ला करू. इराणमध्ये अशी कुठलीच जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही. खरंतर, मध्य-पूर्वेत अशी कुठलीही जागा नाही”.