मागील ४३ दिवसांपासून इस्रायल आणि हमास संघटनेत युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतील हमास संघटनेनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. यानंतर युद्धाला तोंड फुटलं आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इस्रायलकडून गाझापट्टीवर सातत्याने हल्ले केले जात आहेत.
या सर्व घडामोडींदरम्यान, केरळातील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध गुन्हेगार आहेत. त्यांना कोणत्याही न्यायालयीन खटल्याशिवाय गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, असं वक्तव्य खासदार उन्नीथन यांनी केलं. खासदार राजामोहन उन्नीथन हे केरळच्या कासारगोड येथील पॅलेस्टाईन एकता रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. उन्नीथन यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
“दुसऱ्या महायुद्धानंतर, युद्ध गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ‘न्युरेमबर्ग ट्रायल’ नावाची पद्धत वापरली गेली. न्युरेमबर्ग ट्रायलमध्ये, युद्ध गुन्हेगारांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय गोळ्या घालून ठार मारण्यात आले. न्युरेमबर्ग मॉडेल पुन्हा राबवण्याची वेळ आली आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत. नेतन्याहू यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची हीच वेळ आहे. कारण त्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे,” असं उन्नीथन म्हणाले.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने (KPCC) २३ नोव्हेंबर रोजी पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ कोझिकोड समुद्रकिनाऱ्यावर रॅलीचं आयोजन केलं आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.