एपी, जेरुसलेम
गाझामधील दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या अपहृतांची सुटका करण्यासंबंधीचा करार करून १५ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष थांबविण्याबाबत इस्रायलच्या सुरक्षा कॅबिनेटची शुक्रवारी बैठक झाली. त्यात इस्रायल आणि गाझामधील शस्त्रसंधी कराराला मंजुरी देण्यात आली. आता इस्रायलचे सरकार करारावर आपली अखेरची मोहोर उमटवेल. हा करार झाल्यामुळे इस्रायल आणि हमासमधील रक्तरंजित संघर्षाला विराम मिळणार आहे.
या कराराला इस्रायलच्या सरकारने मंजुरी दिली, तर कराराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि मध्यस्थाची भूमिका बजावलेल्या कतारने युद्धविरामाच्या कराराची घोषणा बुधवारी केली. मात्र, हमास या करारापासून फारकत घेत असल्याचा आरोप करून इस्रायलने या कराराला अंतिम रूप देण्यास नकार दिला.
इस्रायलचे पंतप्रधान बिनामिन नेतान्याहू यांनी सुरक्षा कॅबिनेटची बैठक बोलावली. यापूर्वी झालेल्या बैठकीत कराराबाबत निर्णय घेतला नव्हता. इस्रायलने गुरुवारी यावर मतदानाची प्रक्रिया पुढे ढकलली होती. मात्र, नेतान्याहू यांनी विशेष पथकाला गाझामधून सोडण्यात येणाऱ्या ओलिसांना घेण्यास जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, करार झाल्याचे ओलिसांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्यात १२००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. २५०हून अधिक जणांना हमासने ओलीस ठेवले. आतापर्यंत ४६ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा यात मृत्यू झाला आहे. यातील निम्म्याहून अधिक मुले आणि महिला असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
हमासच्या १७ हजारांहून अधिक म्होरक्यांचा खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
करारात काय?
● या करारानुसार गाझामधील १०० पैकी ३३ ओलिसांची पुढील सहा आठवड्यांत सुटका करण्यात येईल. त्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या शेकडो पॅलेस्टिनींना सोडले जाईल.
● इस्रायलचे सैन्य अनेक ठिकाणांहून माघारी फिरेल. हजारो पॅलेस्टिनी पुन्हा त्यांच्या घरात परततील. त्यांच्या मदतीसाठी अनेक देश पुढे सरसावतील.
●कराराच्या दुसऱ्या टप्प्यात ओलीस ठेवलेल्या सैनिकांना सोडले जाईल. त्याची चर्चा पहिल्या टप्प्यात होईल.
● इस्रायलच्या पूर्ण माघारीशिवाय उर्वरित ओलीस सोडणार नसल्याची भूमिका हमासने घेतली आहे. तर, इस्रायलने हमासचे कंबरडे पूर्ण मोडून काढण्याचा निर्धार केला आहे.
● कराराला अंतिम रूप मिळाले, तर रविवारपासून पहिल्या ओलिसाच्या सुटकेपासून अंमलबजावणी होईल.
गाझा पट्टीत हमासने ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेचा करार पूर्णत्वास गेला आहे. याबाबत सुरक्षा कॅबिनेटची बैठक होऊन सरकार कराराला अंतिम मंजुरी देईल.
बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल