वृत्तसंस्था, जेरुसालेम/गाझा
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला सोमवारी एक वर्ष पूर्ण होत असताना रविवारी पश्चिम आशियामधील संघर्ष अधिक चिघळला. रविवारी इस्रायलने मध्य गाझामधील एका मशिदीवर आणि लेबनॉनच्या दक्षिण बैरुतवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये किमान १९ जण ठार झाले. तर इस्रायलच्या बीरशेबा शहरातील बस स्थानकात एका बंदूकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली आणि अन्य १० जण जखमी झाले. या हल्लेखोराला ठार करण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.
गाझामधील प्राणहानी
इस्रायलने रविवारी पहाटे मध्य गाझामधील एका मशिदीवर केलेल्या हल्ल्यामध्ये किमान १९ जण ठार झाल्याचे तेथील अकाऱ्यांनी सांगितले. ही मशीद डेर अल-बलाह या शहरामधील मुख्य रुग्णालयाजवळ होती आणि त्यामध्ये युद्धग्रस्तांनी आश्रय घेतला होता. त्याशिवाय इस्रायली सैन्याने भल्या पहाटे दक्षिण बैरुतमध्येही हवाई हल्ले केले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये अतिरेक्यांना लक्ष्य केल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
हेही वाचा : भोपाळजवळ ९०० किलो एमडी जप्त, १८१४ कोटी रुपये किंमत; गुजरात एटीएस, ‘एनसीबी’ची संयुक्त कारवाई
गाझा पट्टीवर हमास आणि इस्रायलदरम्यान सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी शस्त्रविरामाचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. गाझावरील हल्ले थांबलेले नाहीत. दुसरीकडे, लेबनॉन, सिरीया आणि येमेन हे देशही यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झाले आहेत. त्याशिवाय इराण आणि इस्रायलदरम्यानचा तणावही वाढला आहे. त्यामुळे पश्चिम आशियाच्या इतर देशांमध्ये युद्धाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या कतार आणि इजिप्तसारख्या देशांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
बरोबर एका वर्षापूर्वी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास १२०० जणांचा मृत्यू झाला आणि अडीचशेपेक्षा जास्त जणांना हमासने ओलीस ठेवले. या हल्ल्याला उत्तर देताना इस्रायलने दुसऱ्या दिवसापासून गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले.
युद्धाविरोधात निदर्शने
इस्रायलमध्ये विविध आघाड्यांवर निदर्शने केली जात आहेत. हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावर टीका केली आहे. तर काहीजणांनी हमासला अद्दल घडवल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली आहे. दुसरीकडे अनेक देशांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या निषेधार्थ मोर्चे तसेच युद्ध थांबवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.