वृत्तसंस्था, जेरुसलेम
गाझाच्या उत्तरेकडील एका रुग्णालयातून हमासच्या १०० दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराने कमल आदवान रुग्णालयात गेल्या आठवड्यात शुक्रवारी छापा टाकला. तेथील ४४ पुरुष कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. या छाप्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाल्याचे पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. दोनशे रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : ‘सी-२९५’ प्रकल्प नव्या भारताचे प्रतिबिंब! मोदी, सांचेझ यांच्या हस्ते ‘टाटाएअरबस’च्या कारखान्याचे उद्घाटन
गेल्या वर्षभरापासून हमासबरोबर सुरू असलेल्या संघर्षात इस्रायलने अनेक रुग्णालयांवर आतापर्यंत छापा टाकला आहे. हमास आणि इतर दहशतवादी या रुग्णालयांचा वापर लपण्यासाठी करीत असल्याचा दावा इस्रायल करीत आहे. पॅलेस्टिनी वैद्याकीय अधिकाऱ्यांनी मात्र इस्रायलचा दावा फेटाळून लावला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून गाझाच्या उत्तरेकडे इस्रायल मोठे हल्ले करीत आहे. येथील नागरिकांनी दुसरीकडे निघून जावे, असे इस्रायलने सांगितले आहे. या भागात अद्यापही चार लाख नागरिक असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच सांगितले होते. मदत नीट पोहोचत नसल्याने अनेकांची स्थिती हलाखीची असल्याचीही माहिती आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गाझा येथील संघर्षात आतापर्यंत ४३ हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.