इस्रायलच्या लढाऊ विमानांनी रविवारी सीरियाची राजधानी व आजूबाजूच्या मोक्याच्या जागी जोरदार हवाई हल्ला केला. लेबनॉनमधील हिजबुल्ला अतिरेक्यांना शस्त्रास्त्रांची मदत केल्याच्या संशयावरून हा हल्ला केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. इराणी बनावटीच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या वाहतुकीवर हा हल्ला होता, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सीरियामधून ही शस्त्रे लेबनॉनमधील दहशतवादी गटाच्या हाती पडू नयेत अशी आमची भूमिका असल्याची पुस्तीही इस्रायलने जोडली आहे.
सीरियामध्ये सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडखोरांविरोधात सत्ताधाऱ्यांकडून रासायनिक शस्त्रांचा वापर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर इस्रायलने गेल्या तीन दिवसांत हा दुसरा हल्ला केला आहे. इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी सीरियाच्या राजधानीजवळ असलेल्या लष्करी आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांचा वेध घेतला. या हल्ल्यात मोठी हानी झाल्याचे सीरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
सीरियात सुरू असलेल्या अंतर्गत युद्धात निरपराध्यांचे बळी जात असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच रासायनिक शस्त्रांच्या वापराबाबत कडक शब्दांत टीका केली असून त्याविरोधात लष्करी कारवाई करण्याचा गंभीर इशाराही दिला आहे.
इराणकडून निषेध
इराणी बनावटीची क्षेपणास्त्रे सीरियामधून लेबनॉनमधील दहशतवाद्यांकडे पाठवण्यात येत असल्याच्या इस्रायलच्या आरोपांचे इराणच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रामिन मेहमानपरसत यांनी खंडन केले आहे. तसेच शुक्रवारपासून इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्याची निंदा करीत शेजारील राष्ट्रांना इस्रायलच्या आक्रमणाविरोधात एकजूट राहण्याचे आवाहन केले.
अरब लीगकडून निषेध
सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरोधात बंड पुकारलेल्यांना पाठिंबा देणाऱ्या इजिप्त आणि अरब लीगनेही या हल्ल्यांचा मात्र तीव्र निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तात्काळ हस्तक्षेप करून इस्त्रायलचे हल्ले थांबवावेत, अशी त्यांची मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा