गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात १०० जण ठार झाले आहेत. तर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात १९८ नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला आहे. ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात साडेसाडशेहून अधिक जखमी झाल्याचे इस्रालयी संस्थांनी म्हटले आहे, तर इस्रालयच्या गाझावरील हल्ल्यात १,६१० लोक जखमी झाल्याचा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. दरम्यान, आता युद्ध सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केली आहे. त्यांनी भल्या पहाटे ट्वीट करून ही माहिती दिली.
“आम्ही एका दीर्घ आणि कठीण युद्धाला सुरुवात करत आहोत. हमासने खुनी हल्ले केल्याने युद्धसक्ती लादण्यात आली आहे. आपल्या हद्दीत घुसलेल्या बहुतेक शत्रू सैन्याचा नाश करून पहिला टप्पा संपेल. आम्ही आक्रमक हल्ला सुरू केला असून उद्दीष्ट साध्य होईपर्यंत कोणत्याही विश्रांतीशिवाय हा प्रतिहल्ला सुरूच राहणार आहे. आम्ही इस्रायलच्या नागरिकांना सुरक्षा बहाल करू आणि आपणच जिंकू”, असा विश्वास पंतप्रधान बेंजामिन नेतन्याही यांनी यावेळी व्यक्त केला.
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार मंत्रिमंडळाने हमास आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या लष्करी हल्ल्यांविरोधात इस्रायलने ऑपरेशनल निर्णयांची रणनीती आखली आहे. तसंच, वीज, इंधन आणि वस्तुंचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
हेही वाचा >> गाझापट्टीत युद्धाचा भडका; ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचा प्रतिहल्ला; ३०० मृत्यू, हजारो जखमी
‘हमास’चे ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म!’
‘हमास’च्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद डेफ याने सांगितले की, ‘हमास’च्या सशस्त्र गटाने इस्रायलविरुद्ध नवी लष्करी मोहीम सुरू केली आहे. इस्रायलविरोधात ‘ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म’ ही मोहीम राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत शनिवारी पहाटे इस्रायलवर पाच हजार ‘रॉकेट’ डागण्यात आले, तर इस्रायली संस्थांच्या म्हणण्यानुसार २५०० रॉकेट डागण्यात आले.