ऐनवेळी इंधनगळती झाल्यामुळे जीएसएलव्ही डी-५ या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण सोमवारी अनिश्चित कालावधीपर्यंत रद्द करण्यात आले. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) वैज्ञानिकांसह तमाम देशवासीयांचा हिरमोड झाला. इंधनगळतीची कारणे शोधून लवकरच उपग्रहाच्या प्रक्षेपणाची नवीन तारीख कळवण्यात येईल असे इस्रोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन जोडून तयार करण्यात आलेल्या जीएसएलव्ही डी-५ उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठीची रविवारपासूनच २९ तासांची उलटगणती सुरू झाली होती. सोमवारी दुपारी चार वाजून ५० मिनिटांनी डी-५ हवेत झेपावणारही होते. मात्र, प्रक्षेपणाला ७४ मिनिटांचा कालावधी बाकी असतानाच प्रक्षेपकाच्या दुसऱ्या टप्प्यात इंधनगळती होत असल्याचे निदर्शनास आले.  
उड्डाणाचे महत्त्व
या उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट-१४ हा १९८२ किलो वजनाचा उपग्रह सोडण्यात येणार होता.  
जीएसएलव्हीच्या उड्डाणासाठी तीन टप्पे महत्त्वाचे असतात.
१  घन इंधनाच्या साह्य़ाने उपग्रहाचे अवकाशात उड्डाण
२ द्रवरुप इंधनाचा वापर.
३ क्रायोजेनिक इंजिन कार्यरत होते.
जीएसएलव्ही प्रक्षेपणाचे प्रयत्न दोनदा अपयशी ठरले आहेत. १५ एप्रिल २०१० रोजी डी-३ तर डिसेंबर, २०१० मध्ये डी-४ हे उपग्रह अवकाशात सोडण्यात इस्रोला यश आले नव्हते. त्यावेळी अनुक्रमे रशियन व भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन उपग्रहांत होते.