चंद्रावर मॅगनिज आणि क्रोमियम या मुलद्रव्यांचे अस्तित्व चांद्रयान -२ यानाने शोधले आहे. या मुलद्रव्यांचे प्रमाण नगण्य स्वरुपात आहे. चांद्रयान -२ मोहिमेला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने ‘ल्युनर सायन्स वर्कशॉप’ चे आयोजन केले होते. यावेळी या शोधाबद्द्ल माहिती देण्यात आली. चांद्रयान -२ हे चंद्राभोवती १०० किलोमीटर उंचीवर फिरत असून त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आणखी पुढील काही वर्षे नवीन माहिती मिळत राहील असा विश्वास इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी यावेळी व्यक्त केला. चांद्रयान -२ ने चंद्राभोवती ९००० प्रदक्षिणा पूर्ण केल्या असल्याचंही यावेळी जाहिर करण्यात आलं.

चांद्रयान -२ च्या माध्यमातून चंद्राच्या निर्मितीची आणि सुर्यमालेची जडणघडण याबद्द्लची माहिती पुढे येईल. वातावरण नसलेल्या चंद्रावर सुर्यमालेच्या निर्मितीचे पुरावे असावेत असा अंदाज सीवन यांनी व्यक्त केला.

चांद्रयान -२ यान हे २२ जुलै २०१९ ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. २० ऑगस्ट २०१९ ला चांद्रयान -२ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. ६ सप्टेंबरला चांद्रयान -२ च्या विक्रम लँडरने चांद्रभुमिवर अलगद उतरण्याचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये अपयश आलं होतं, विक्रम लँडर हे चांद्रभुमिवर आदळत निकामी झालं होतं. असं असलं तरी चंद्राभोवती फिरणाऱ्या चा्ंद्रयान -२ यानावरील ८ वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मोठी माहिती जमा झाली आहे. विविध वैज्ञानिक संस्था, विद्यापीठे यांना ही माहिती विश्लेषणाकरता दिली जाईल. या माध्यमातून देशभरातून चंद्रायान -२ ने मिळवलेल्या माहितीचा अभ्यास केला जाईल आणि नवीन माहिती पुढे येईल असा विश्वास इस्त्रोच्या अध्यक्षांनी व्यक्त केला.

Story img Loader